• Fri. Sep 4th, 2026

Mumbai Bus Fire : मुंबईत गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली बसला भीषण आग, पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. मेट्रो स्टेशनच्या खाली ही घटना घडली. या घटनेवेळी मेट्रो स्थानकात प्रचंड धुराचं साम्राज्य निर्माण झालं. यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव मेट्रो स्टेशनच्याखाली बेस्ट बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मेट्रो स्टेशनच्या बरोबर खाली ही दुर्घटना घडली. या घटनेत बस जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत सध्या तरी कुणी जखमी झाले आहे का? याची माहिती मिळू शकलेली नाही. पण बसला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे मोठे लोट निर्माण झाले होते. मेट्रो स्टेशनखालीच घटना घडल्यामुळे मेट्रो स्टेशनवर सर्वत्र धूर पसरला. हा धूर इतका परसरला की प्रवाशांना श्वास घेण्यास अडचणी येऊ लागल्या. या धुरामुळे सर्व प्रवाशी मेट्रो स्टेशनच्या बाहेर आले.

संबंधित घटना ही शुक्रवारी (4 सप्टेंबर) संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास घडली. ही बस पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असतानाच या बसला अचानक आग लागल्याची माहिती आहे. बसने अचानक पेट घेतल्यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. बसमधून प्रवास करणारे प्रवासी प्रचंड घाबरले. प्रवासी तातडीने बसमधून बाहेर पडले. त्यामुळे त्यांचा जीव बचावल्याची माहिती आहे.

अग्निशामक दल घटनास्थळी तातडीने दाखल

दरम्यान, बसला आग लागल्याची माहिती तातडीने अग्निशामक दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न केले जात आहेत. या दरम्यान बसला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट तयार झाले.

मेट्रो स्टेशनवर गोंधळाची स्थिती

अगदी मेट्रो स्टेशनच्या खाली ही घटना घडली आणि परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. हा धूर वर असलेल्या मेट्रो स्टेशनमध्ये देखील घुसला. त्यामुळे मेट्रो स्टेशनवर असलेल्या प्रवाशांमध्ये देखील भीती निर्माण झाली. मेट्रो स्टेशनवर प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर मेट्रो स्टेशनवरील प्रवाशांनी मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Maharashtra TimesSolapur News : सोलापुरात 86 वर्षांच्या माजी नगरसेवकावर हल्ला, 25 वर्षांपूर्वीच्या वादाच्या रागातून आरोपीचं कृत्य

पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण घटनेमुळे परिसरात प्रचंड मोठा गोंधळ उडाला. बसला लागलेली आग भीषण असल्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे महामार्गावर आधीच वाहनांची गर्दी होती. त्यात आगीच्या घटनेमुळे जास्त वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिणामी नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

Maharashtra TimesVidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्या मराठीचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

पोलिसांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु

संध्याकाळची वेळ असल्याने ऑफिसची कामे आवरुन घरी जाणाऱ्यांची रस्त्यावर आणि मेट्रो स्थानकावर मोठी गर्दी असते. पण आगीच्या घटनेमुळे मेट्रो स्थानकात धूर जमा झाल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दोन मेट्रो स्थानकांवर मेट्रो न थांबवण्याचा निर्णय घेतला. सध्या परिसरात पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. तसेच ही आगीची घटना नेमकी कशामुळे घडली? याचा देखील तपास केला जाणार आहे.