• Sat. Jun 6th, 2026
    Marathi Compulsion : आता मराठी बोलावीच लागणार! महायुतीचे तीनही पक्ष ठाम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही भूमिका स्पष्ट

    रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयावर आता सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीदेखील भूमिका स्पष्ट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची केली आहे. तसेच मराठी बोलता आली नाही तर थेट परवाना रद्द केला जाईल, असा कडक नियम लागू करण्यात येणार आहे. येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून या नियमांचे कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक नाराज आहेत. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी सरकारला थेट संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यामुळे मराठीसक्तीच्या मुद्द्यावरुन मुंबईत राजकारणदेखील तापताना दिसत आहे. याच प्रकरणात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. विशेष म्हणजे या मुद्द्यावर आता महायुतीच्या पक्षांचे एकमत होताना दिसत आहे.

    रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाला शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी कुणाला कुठल्याही भाषेची सक्ती करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. असं असलं तरी शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे मराठी सक्तीसाठी आग्रही आहेत. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा बोलता येणं अनिवार्य असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

    मराठी सक्तीच्या निर्णयावरुन प्रताप सरनाईक यांची आज मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांसोबत चर्चा झाली. या चर्चेत मराठी शिकवण्यासाठी काय-काय उपाययोजना केल्या जातील. तसेच रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वेळ हवा असल्यास तो देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या सक्तीच्या निर्णायवर आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलं. तसेच मराठी शिकण्यासाठी अमराठी चालकांना वेळ वाढवून द्यायचा का? याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

    महायुतीमधील इतर पक्षांचं मत काय?

    रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या या निर्णयाचं महायुतीमधील इतर घटकपक्षांकडून स्वागत केलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच महायुतीचा दुसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही आता अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. त्यांना या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

    सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

    “देशातील कोणत्याही प्रदेशात आपण गेल्यानंतर त्या प्रदेशाची संस्कृती आणि भाषा आपण आपलीशी करून घ्यायला हवी, विविधतेत एकता हे एक आपल्या देशाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्थानिक भाषा आणि संस्कृती आत्मसात केल्याशिवाय हे वैशिष्ट्य टिकून राहणार नाही”, अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली आहे.

    “मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाने इथल्या संस्कृतीचा आणि भाषेचा आदर केलाच पाहिजे. रिक्षा-टॅक्सीचालक हा प्रवाशांशी थेट जोडलेला असतो, त्यामुळे त्याला मराठी येणे हे प्रवाशांच्या सोयीचेही आहे. यासंदर्भात टप्प्याटप्प्याने मराठीच्या सक्तीची अंमलबजावणी करायला हरकत नाही. दुसऱ्या बाजूला मराठी प्रवाशांनीही प्रवास करताना जाणीवपूर्वक मराठी भाषेचा वापर करावा”, असं आवाहन सुनील तटकरे यांनी केलं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा