Couple Death in Ambenali Ghat : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दुर्दैवी घटना घडली आहे. ७०० फूट खोल दरीत कोसळून सोनगिरवाडीतील चव्हाण दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दाट धुके आणि निसरड्या रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अंबनेळी घाटात दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड: पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात घडून बाईकस्वार दांपत्याचा सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 23 एप्रिल रोजी सायंकाळी घडली. दाट धुके, निसरडा रस्ता आणि घाटातील धोकादायक वळण यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेनळी घाटातील अतिधोकादायक वळणावर स्प्लेंडर बाईक बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे बाईकवरील प्रवासी दरीत कोसळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर तात्काळ प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.
७०० फूट दरीत आढळल्या बॉडी
शोधकार्यादरम्यान सुमारे ७०० फूट खोल दरीत मोहन चव्हाण (वय ५५) आणि जयश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी) यांचे मृतदेह आढळून आले. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, घटनास्थळी अवकाळी पाऊस, दाट धुके आणि निसरडा उतार यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. कमी दृश्यमानता आणि खोल दरीमुळे रेस्क्यू टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य जीव धोक्यात घालून मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या घटनेनंतर पोलादपूर व महाबळेश्वर पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्याला मदत केली. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
आंबेनळी घाट हा अतिधोकादायक वळणांचा आणि खोल दऱ्यांचा घाट म्हणून ओळखला जातो. विशेषतः पावसाळ्यात रस्ता निसरडा होत असल्याने अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे वाहनचालकांनी वेग मर्यादित ठेवावा, सतर्कता बाळगावी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा