• Mon. Jun 15th, 2026
    Weather Forecast: मुंबई परिसर तापणार, मात्र काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार; IMD चा ताजा अंदाज

    Maharashtra Weather Alert 23 april 2026: पुण्यात गारा पडतानाचे व्हिडिओ, फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून पुणेकरांनी आनंद इतरांबरोबरही शेअर केला. तासभर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. संध्याकाळी आकाश ढगाळ होते, उकाडा कमी झाला होता.

    मुंबई परिसर तापणार, मात्र काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार; IMD चा ताजा अंदाज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यभरात उष्ण आणि दमट वातावरणाचा प्रभाव कमी होऊन अवकाळीची हजेरी लागलेली असताना महामुंबई परिसरात पुन्हा एकदा उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस मुंबईतील वातावरण तापलेले असू शकेल.

    मुंबईमध्ये गुरुवारपासून कमाल तापमानाचा पारा पुन्हा एकदा वर चढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी गुरुवारी उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊसही पडू शकेल. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात शुक्रवारीही हीच परिस्थिती असू शकेल, तर मुंबईत शनिवारीही उष्ण, दमट स्थितीचा अंदाज आहे. कोकणात शुक्रवारी पावसाची शक्यता आहे.

    पुण्यात पडला गारांचा पाऊस

    मध्यवर्ती पुण्यासह कोथरूड, औंध, बाणेर, सिंहगड रस्त्यावर बुधवारी दुपारी गारांसह पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांत वाढलेला उकाडा आणि कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना थोडा वेळ पडलेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. संध्याकाळी वातावरण सुखद होते; पण रात्री पुन्हा उकाडा वाढला.
    शहरात बुधवारी सकाळपासूनच उकाडा वाढला होता. दहानंतर उन्हाची तीव्रताही वाढत गेल्याने रस्त्यावर फिरून उष्णतेच्या झळा जाणवत होत्या. हवेतील आर्द्रता आणि वाढल्याने तापमानामुळे घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते. दुपारी तीन नंतर मात्र अचानक वातावरण बदलले आणि आकाशात ढग दाटून आले. पावसाची शक्यता बघून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले; पण जे कामानिमित्त बाहेर होते, त्यांची मात्र चारच्या सुमारास आलेल्या पावसाने धांदल उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानकच पाऊस सुरू झाला.

    कोथरूड, पाषाण, औंध, बाणेर; तसेच सिंहगड रोड आणि पेठ भागांत आधी मोठ्या आकारातील गारा पडल्या आणि लगेचच पाऊस सुरू झाला. या हंगामातील पहिला गारांचा पाऊस असल्याने पुणेकरांनी गारांचा आनंद घेतला, उकाड्याने वैतागलेली मुले आणि मोठेही गारा वेचण्यासाठी रस्त्यावर आले.

    वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

    धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी विजा, वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. या अवकाळी पावसात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना विठ्ठलवाडी (ता. धाराशिव) येथे घडली. येथील बबन गोविंद लांडगे (वय ४८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. २१ एप्रिल रोजी रात्री धाराशिव जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. लांडगे यांच्याकडे दीड एकर शेती आहे. शेतातील ज्वारीची काढणी झाली होती. शेतात कडबा पडला होता. रात्री पावसाला सुरवात झाली. चारा भिजू नये, म्हणून बबन लांडगे व त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाइक शेतात धावले. कडब्याची गंजी लावण्यासाठी धावपळ सुरू होती. पाऊस वाढल्याने कुटुंबीय आडोशाला गेले. कडबा सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या बबन लांडगे यांच्यावर नियतीने घाला घातला. वीज कोसळली आणि बबन लांडगे यांचा जागीच मृत्यू झाला.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा