• Sat. Jun 6th, 2026
    पतीला धर्म विचारुन संपवलं, मनात येतं दहशतवाद्यांशी लढून त्यांना वाचवू शकले असते तर… प्रगती संतोष जगदाळेंची जखम अजूनही भळभळती

    Pune Santosh Jagdale Family on Pahalgam Attack : वर्षभरात खूप काही घडलं, पण आमच्या जखमा अजून ओल्या आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या आसावरी जगदाळे आणि त्यांची आई प्रगती जगदाळे यांनी मांडलेली ही कैफियत खूप काही सांगून गेली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : तारखेनुसार एक वर्ष उलटले असेल; पण आम्ही मनाने अजूनही पहलगाममध्ये आहोत. बैसरण व्हॅलीमध्ये पर्यटक निवांत फिरत आहेत, निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहेत. अचानक काही शस्त्रधारी लोक येतात काय… हिंदू आहात की मुस्लिम अशी विचारणा करून गोळीबार करतात काय…! डोळ्यादेखत आम्ही अनेकांचे लोकांचे मृत्यू बघितले… या हल्ल्यात आई आणि मी वडिलांना गमावले.. निरपराध पर्यटकांवर ओढावलेला हा प्रसंग डोळ्यासमोरून जाईल तरी कसा… वर्षभरात खूप काही घडले आहे; पण आमच्या जखमा अजून ओल्या आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या आसावरी जगदाळे यांनी मांडलेली ही कैफियत खूप काही सांगून गेली.

    सगळं सुरळीत सुरु असताना दुःखाचा डोंगर

    पुण्यातील आसावरी जगदाळे या त्यांचे वडील संतोष आणि आई प्रगती यांच्यासमवेत गेल्या वर्षी उन्हाळी सुट्ट्यांसाठी काश्मीरमध्ये पर्यटनाला गेल्या होत्या. सगळे काही सुरळीत होते. बैसरण व्हॅलीमध्ये इतर पर्यटकांबरोबरच जगदाळे कुटुंबही निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यात मग्न होते. त्या वेळी झालेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी संतोष जगदाळे यांच्यावर केलेल्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सगळा प्रकार एवढा अनपेक्षित होता की आसावरी आणि त्यांच्या आईला मोठा धक्का बसला. वडील सोडून गेल्याचे दुःख तर होते; पण त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यापासून ते घराची आर्थिक बाजू सांभाळण्यापर्यंत जबाबदारी आसावरी यांच्यावर आली.

    मानसिक-आर्थिक अडचणींचा सामना

    वर्षभरातील घडामोडीचा पट उलडताना आसावरी जगदाळे म्हणाल्या, वर्षभरात आम्ही मायलेकींनी मानसिक, शारीरिक, आर्थिक अशा अनेक अडचणींचा सामना केला. अनेकदा आजारी पडलो, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. सरकारने मला दिलेले नोकरीचे आश्वासन आणि आर्थिक मदत मिळविण्यासाठी खूप पाठपुरावा करावा लागला. अनेकांशी संपर्क साधल्यानंतर आर्थिक मदत उपलब्ध झाली. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला. नोकरीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दोन मिनिटे बोलायचे होते; पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गच कोणी सांगत नव्हते. अखेर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला. आमच्या मागण्यांचे पत्र त्यांनी दिल्लीत गेल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवले.
    Maharashtra TimesAmravati Crime : अयानचा निर्लज्जपणा, पैशांसाठी कुटुंबालाही सोडलं नाही, आईच्या स्त्रीधनालाच हात घातला
    समाजमाध्यमांद्वारे आमच्या प्रलंबित मागण्यावर त्यांनी भाष्य केले. मेधाताईंच्या पाठपुराव्यामुळे महिनाभरात आमचे काम झाले. सरकारने मला मार्च महिन्यात महापालिकेमध्ये नोकरी दिल्याचे पत्र दिले. नोकरीचा आनंद आहे; पण वडील नाहीत, याचं दुःखही तेवढंच मोठं आहे. आई अजून धक्क्यातून सावरलेली नाही. तिला पुढे घेऊन जायचे आहे. नवीन काही शिकत नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न मी आता करणार आहे…असा आशावादही आसावरी यांनी व्यक्त केला.

    Pahalgam Attack | हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, अजूनही भयानक आठवणी ताज्या, आजही डोळे पाणावतात

    दहशवादी आल्याची स्वप्ने

    गेल्या वर्षभरात आम्ही दोघी एकही रात्र सलग आठ तास झोपू शकलो नाही. कानात लोकांच्या किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज गुंजतात. पहलगाममध्ये फिरत आहोत, दहशतवादी अचानक समोर आले आहेत, बेछूट गोळीबार करीत आहेत. कधी ते आमच्या घरात शिरले आहेत, आमचा पाठलाग करीत आहेत… अशी धडकी भरवणारी स्वप्न रोज पडतात. यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही समुपदेशन घेतले; पण मनातील भीती कायम आहे. तो वेदनादायी प्रसंग शब्दांत मांडणे कठीण आहे, असे सांगताना आसावरी आणि प्रगती जगदाळे भावूक झाल्या.
    Maharashtra TimesCrime News : मसाल्यातून विष, सासूचा मृत्यू; डॉक्टरांना कॉलेजमधले धडे आठवले, नववधूच्या नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं

    उरलेले आयुष्य देश आणि धर्मासाठी

    ‘दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारण्यापूर्वी त्यांची धार्मिक ओळख विचारली होती. माझ्या पतीला धर्म विचारल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. त्या क्षणाचा विचार केला की मनात येते, मी तेव्हा काही करू शकले असते का? मी त्यांची बंदूक हिसकावून घेतली असती किंवा त्यांच्याशी लढून पतीला वाचवले असते का? हे विचार मला रोज छळतात. देवाने मला जिवंत ठेवले आहे, यामागे नक्कीच काही तरी कारण असावे. त्या घटनेने आम्हाला खूप काही शिकवले आहे. मी आणि माझ्या मुलीने आता उरलेले आयुष्य देश आणि धर्मासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे प्रगती जगदाळे यांनी सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा