Jalgaon Crime : तरुणाच्या हत्येतील फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या
चोपडा शहरातील चोपडा-धरणगाव रोडवरील पाटचारीजवळ प्रदीप राजेंद्र महाजन यांचा पूर्व वैमनस्यातून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. यात संशयित दोन आरोपी फरार झाले होते, तर एका आरोपीला अटक करण्यात आली होती. प्रदीप राजेंद्र महाजन या तरुणाची हत्या करून विजय भास्कर वैदकर व निर्मल संजय बडगुजर हे आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे त्यांचा मुंबईपर्यंत माग काढला. आरोपी जळगावकडे परत येत असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, ते दादरवरून कोणत्या रेल्वेत बसले याची कल्पना पोलिसांना होती. जळगाववरून निघालेले पोलीस यांनी नाशिक येथे उतरून नाशिक ते चाळीसगावदरम्यान धावत्या रेल्वेत कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.
