• Sat. Jun 6th, 2026
    Mumbai Local: चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल आमनेसामने; CSMT स्थानकात गोंधळ, अनर्थ टळला, स्टेशन मास्तर निलंबित

    Mumbai Local Train Disruption: सीएसएमटी स्टेशनवर मंगळवारी दुपारी काही क्षणांसाठी दोन लोकल समोरासमोर आलेल्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

    मुंबई लोकल ट्रेन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मंगळवारी दुपारची वेळ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर नेहमीचा गजबजाट असताना एका चुकीच्या सिग्नलने निर्माण झालेला तणाव प्रवाशांनी अनुभवला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी दुपारी काही क्षणांसाठी ‘समोरासमोर’ आलेल्या दोन लोकलमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ अवघ्या १३० मीटरवर रोखला गेला आणि शेकडो प्रवाशांचे जीव वाचले. या गंभीर प्रकाराची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने संबंधित स्थानकप्रमुखाला तत्काळ निलंबित केले.

    बदलापूरहून येणारी जलद लोकल दुपारी ३.१८ वाजता नियोजनानुसार प्लॅटफॉर्म क्रमांक ४वर येणे अपेक्षित होते. परंतु सिग्नल यंत्रणेत झालेल्या गंभीर चुकीमुळे तिला प्लॅटफॉर्म क्रमांक ५चा सिग्नल देण्यात आला. त्याचवेळी त्या प्लॅटफॉर्मवर खोपोली लोकल उभी असल्याने काही क्षणांसाठी धडकी भरवणारी स्थिती निर्माण झाली. सीएसएमटीसारख्या अत्यंत व्यग्र स्थानकावर होम सिग्नल, इनर होम सिग्नल आणि प्लॅटफॉर्म सिग्नल अशा टप्प्यांत गाड्यांना प्रवेश दिला जातो; मात्र याच प्रक्रियेत झालेल्या त्रुटीमुळे गोंधळ उडाला.
    Maharashtra TimesWeather Updates: पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल! कुठे उष्णतेची लाट, तर कुठे गारपीट; IMDकडून 13 राज्यांना अलर्ट जारी
    बदलापूर लोकलने प्लॅटफॉर्म ५चा होम सिग्नल ओलांडला, परंतु पुढील इनर होम सिग्नल लाल असल्याचे लक्षात येताच मोटरमनने क्षणाचाही विलंब न करता ब्रेक लावला. त्यावेळी समोर उभ्या असलेल्या खोपोली लोकलपासून ती अवघ्या १३० मीटरवर होती. काही सेकंद उशीर झाला असता, तर गंभीर दुर्घटना घडली असती. या घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करत या ट्रेनला मागे घेऊन योग्य प्लॅटफॉर्मवर आणले.

    या गोंधळाचा परिणाम संपूर्ण स्थानकावर दिसून आला. प्लॅटफॉर्म क्रमांक ५, ६, ७ आणि ८ वर सुमारे २५ मिनिटे लोकलची ये-जा पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी, सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल सिग्नलवर अडकल्या, तर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी हा परिणाम अधिक जाणवला; अनेक गाड्या पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले.
    Maharashtra TimesDevendra Fadnavis: विरोधकांचा खरा चेहरा उघडा पडला! महिला आरक्षण मुद्द्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांची टीका
    सिग्नल देताना नेमकी चूक कुठे झाली, यासाठी मानवी हस्तक्षेप कितपत कारणीभूत होता आणि सुरक्षा प्रक्रियेत कोणत्या पातळीवर त्रुटी राहिल्या, याचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात रेल्वेने दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या गोंधळामागे मानवी चूक ही प्रमुख कारण असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा