• Sat. Jun 13th, 2026
    Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 जणांना नगरसेवकपदाची लॉटरी, कुणाकुणाला मिळाली संधी?

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 10 स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्वीकृत नगरसेवकपदी कुणाला संधी मिळते? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर स्वीकृत नगरसेवकांची यादी आज जाहीर झाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या दहा स्वीकृत सदस्यांची नियुक्ती महापौर समीर राजूरकर यांनी सोमवारी (२० एप्रिल) जाहीर केली. यात भाजपचे नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराड, अमृता पालोदकर, शुभम काळे, प्रदीप शिंदे, कुणाल खरात यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे. शासनाने महापालिकेतील स्वीकृत सदस्यांची संख्या पाच वरुन दहा केली आहे. त्यामुळे दहा सदस्य नियुक्तीसाठी पालिकेच्या प्रशासनाने कार्यवाही केली. त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले. ८० जणांनी स्वीकृत सदस्य होण्यासाठी अर्ज सादर केले. या अर्जांची छाननी झाल्यावर ५२ अर्ज वैध ठरले. वैध ठरलेल्या अर्जातून दहा जणांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

    पालिकेतील पक्षीय बलाबलानुसार भाजपच्या वाट्याला पाच स्वीकृत सदस्य आले आहेत. एमआयएमच्या वाट्याला तीन सदस्य आले आहेत. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वाट्याला प्रत्येकी एक सदस्य आला. पालिकेची सर्वसाधारण सभा सुरु झाल्यावर त्या त्या पक्षाच्या गटनेत्यांनी महापौरांकडे आपल्या पक्षाच्या स्वीकृत सदस्यांच्या नावाची यादी दिली. या यादीनुसार महापौरांनी स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा केली.

    राजकीय पक्षनिहाय पालिकेतील स्वीकृत सदस्य

    भाजप – हर्षवर्धन कराड, छाया खाडेकर, गोकुलसिंह मलके, विजयसिंग झाला, अमृता पालोदकर

    एमआयएम – कुणाल खरात, अहेमद शेख इलियास, मोहमद असरार मोहमद अकबर

    शिवसेना – शुभम काळे

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष – प्रदीप उर्फ हनुमान शिंदे

    मनपा स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेना शिंदे गटात अंतर्गत संघर्ष

    दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने स्वीकृत नगरसेवक पदासाठी शुभम काळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र, या निवडीमुळे पक्षात दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. निवडीचा निषेध करण्यासाठी क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले, तर दुसरीकडे जिल्हाप्रमुखांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

    नेमका वाद काय?

    स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक पदाधिकारी इच्छुक होते. पक्षाने शुभम काळे यांचे नाव निश्चित केल्यानंतर इच्छुक उमेदवार विनोद बनकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बनकर यांनी क्रांती चौकात जमून उपमहापौर तथा जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. यावेळी जंजाळ यांच्या फोटोला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली. निवड प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आणि विशिष्ट विचारसरणीला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप बनकर यांनी यावेळी केला.

    जंजाळ यांचे स्पष्टीकरण, ‘वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य’

    या आंदोलनानंतर राजेंद्र जंजाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्वीकृत नगरसेवक किंवा इतर कोणत्याही पदाची नियुक्ती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते करत असतात. जिल्हाप्रमुख म्हणून त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे ही माझी जबाबदारी आहे, असे जंजाळ यांनी सांगितले. स्वतःवर झालेल्या जातीवादाच्या आरोपांचा समाचार घेताना ते म्हणाले की, पक्षाने नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. दलित समाजातील प्रेमलता दाभाडे यांना शिक्षण सभापती पद दिले असून, जिल्ह्याचे पालकमंत्री देखील त्याच समाजाचे आहेत. त्यामुळे जातीवादाचा आरोप करणे चुकीचे आहे.

    पक्षांतर्गत शिस्तीचा प्रश्न

    विनोद बनकर यांना संधी न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला असावा, असे जंजाळ यांनी नमूद केले. दरम्यान, या आंदोलनामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली गेल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. या संपूर्ण घटनेचा अहवाल आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाणार असून, शिस्तभंगाची कारवाई होणार की समन्वयाने मार्ग काढला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा