• Sat. Aug 1st, 2026
    Crime News: वडिलांचं निधन, कुटुंबाची जबाबदारी, पण आदित्यला नको तो नाद लागला; 24 व्या वर्षीच मृत्यूला कवटाळलं!

    Kolhapur News: पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सहाय्यक फौजदार सुवर्णा गायकवाड यांच्याकडे सोपवला असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.

    वडिलांचं निधन, कुटुंबाची जबाबदारी, पण तरुणाला नको तो नाद लागला; 24 व्या वर्षीच मृत्यूला कवटाळलं!(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर: ऑनलाइन गेमिंग बऱ्याचदा खेळणाऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकत असते. अशीच एक घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील 24 वर्षीय आदित्य मिलिंद कोळी याने ऑनलाईन गेमिंगचा नाद लागल्यानंतर अडचणीत सापडल्याने थेट आत्महत्याचा निर्णय घेतला आहे. गेमिंगच्या माध्यमातून पैसे हरल्याने उद्भवलेल्या आर्थिक नुकसानीतून तो नैराश्यात आला होता. त्यामुळेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून, त्यात त्याने आपण गेमिंगच्या व्यसनामुळे मोठ्या प्रमाणात पैसे गमावल्याने नैराश्यग्रस्त झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते.

    शनिवारी सायंकाळी घरातील बाकी सदस्य कामात असताना आदित्यने वरच्या मजल्यावरील खोलीतील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तात्काळ खाली उतरविण्यात आले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती त्याचा चुलत भाऊ भालचंद्र कोळी याने शहापूर पोलीस ठाण्यात दिली.

    वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी अन् गेमिंगच्या आहारी

    हातकणंगले तालुक्यातील आदित्यच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाल्यानंतर घरात आई, लहान बहीण आणि आदित्य असे तिघेजण राहत होते. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असतानाच तो ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकला. गेमिंगमध्ये लावलेले पाच हजारांपासूनचे पैसे लाखोंच्या घरात गेल्याने त्याच्यावर आर्थिक बोजा वाढत गेला.

    लाखोंचा फटका आणि अंतिम पाऊल

    सुरुवातीला दहा हजार रुपये गेमिंगमध्ये गुंतवल्यानंतर त्याने नंतर मित्रांकडून घेतलेले पैसे देखील हरले. आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःचा 35 हजार रुपये किमतीचा मोबाईल विकून ती रक्कम गेमिंगमध्ये ओतली. त्यानंतर इतर ठिकाणांहून घेऊन 80 हजार रुपये देखील त्याने गेमिंगमध्ये गमावले, ज्यामुळे तो कर्जबाजारीपणात सापडला. सुसाईड नोटमध्ये त्याने गेमिंगमध्ये पैसे हरल्याने उद्भवलेल्या नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले असून, याला कोणास जबाबदार धरू नये अशी विनंतीही केली आहे.

    पालक–समाजामध्ये चिंतेचं वातावरण

    आदित्य मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने परिसरात त्याचा मोठा मित्रपरिवार होता. त्याच्या अशा अचानक निधनाने परिसरात आणि विशेषतः पालक–तरुणांच्या मनात ऑनलाईन गेमिंगच्या धोक्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांच्या भाषेत गेमिंगच्या व्यसनातून अशा प्रकारचे आर्थिक–मानसिक संकट वाढत असल्याने तरुणांना वेळीच मानसिक आरोग्य सेवा, पालकांचे मार्गदर्शन आणि इंटरनेट–मोबाईल वापरात नियंत्रण आवश्यक आहे, असे तज्ज्ञांकडून म्हटले जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा