Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून चुलत्याने २१ वर्षीय पुतण्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
चुलत्याने पुतण्याला संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रहीम शेख, धाराशिव :जमिनीचा अन् पैशांचा नाद लै बेकार, कोणी कधीच कोणतं नातं बघत नाही, ना कोणता नातेसंबंध. संपत्तीसाठी सख्खा भाऊसुद्धा वैरी बनतो, कारण की अशीच एक घटना आता समोर आली आहे. ज्यामध्ये एका चुलत्याने पुतण्याला जीवे मारलं आहे. त्यामागील कारण म्हणजे जमीन. होय,धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विलास शेळके असे आरोपी चुलत्याचे नाव असून त्याने पुतण्या सुजित शेळके याच्या पोटावर चाकूने वार करून त्याला ठार मारले.
नेमका हत्येचा घटनाक्रम काय?
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास शेळके आणि मयत सुजित शेळके यांचं नातं हे चुलता पुतण्याचं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये जमिनीवरुन वाद सुरु होते. याच जमिनीच्या व्यवहारावरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये तणावाचं वातावरण असाताना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सुजित हा घरात आजी आजोबांसोबत झोपला होता. त्यावेळी आरोपी विलास तिथे आला आणि त्याने सुजितला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
शिवीगाळ अन् हत्या
झोपेत असलेल्या शिवीगाळीला ऐकताच सुजित उठला आणि बाहेर गेला. यावेळी शिवीगाळीचे रूपांतर जोरदार भांडणात झाले. रागाच्या भरात विलासने जवळील चाकूने सुजितच्या पोटावर सपासप वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या सुजितचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच शिराढोण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मृत सुजित शेळकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात आरोपी विलास शेळके याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
परिसरात हळहळ
दरम्यान, सख्या चुलत्यानेच पोटच्या पुतण्याचा जीव घेतल्याने खामसवाडी व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जमिनीच्या किरकोळ वादातून कुटुंबातच झालेल्या या हत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा