• Thu. Jun 18th, 2026
    Goregaon Concert Tragedy : नेस्को अंमली पदार्थ मृत्यू प्रकरण, फरार सप्लायर आयुष साहित्यला मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांकडून अटक

    Mumbai Concert Tragedy peddler arrested : गोरेगावच्या नेस्को मैदानावर झालेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी आयुष साहित्य याला पोलादपूर पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून अटक केली आहे.

    अमली पदार्थ सप्लाय करणाऱ्याला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, अलिबाग: गोरेगाव येथील नेस्को मैदानावर (NESCO Ground) झालेल्या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन युवकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक प्रकरणाच्या तपासात मोठी प्रगती झाली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी आयुष विकी साहित्य (वय २४, रा. उल्हासनगर) याला पोलादपूर पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे अंमली पदार्थ पुरवठा साखळी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    नेमकी घटना काय?

    या प्रकरणी मुंबईतील वनराई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कॉन्सर्टदरम्यान ‘एक्सटसी’ (Ecstasy) या अमली पदार्थाचे वितरण झाल्याचे तपासात समोर आले होते. याच्या अतिसेवनामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला होता, ज्या मुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध सुरू केला होता.

    असा रचला सापळा

    दरम्यान, मुख्य आरोपी आयुष साहित्य हा मुंबई-गोवा महामार्गाने गोव्याच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मुंबई पोलिसांनी पोलादपूर पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलादपूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत महामार्गावर नाकाबंदी केली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून आरोपीला अडवण्यात आले आणि त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

    Maharashtra TimesMaharashtra Goverment : मंत्रालयात मंत्र्यांसोबत आता एकाच व्यक्तीला प्रवेश, उपस्थितीसाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी अनिवार्य, गर्दी नियंत्रणासाठी मोठा निर्णय

    तपासात मोठे धागेदोरे मिळण्याची शक्यता

    तपासादरम्यान आयुष साहित्य यानेच कॉन्सर्टमध्ये ‘एक्सटसी’ या अंमली पदार्थाचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी वनराई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या अटकेमुळे प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली असून या रॅकेटमधील इतर संबंधितांचीही नावे समोर येण्याची शक्यता आहे.

    या अधिकाऱ्यांच्या पथकाने केली कारवाई

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, स्वप्नील कदम, तुषार सुतार, सुनील कांजर आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून, ड्रग्जविरोधातील लढ्यात ही मोठी यशस्वी मोहीम मानली जात आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कन्सर्ट आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षेची कडक अंमलबजावणी करण्याची गरजही अधोरेखित होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा