नागपूर : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी भोजनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून विदर्भातील सावजी भोजनालय व्यावसायिक आणि हलबा समाज युवा संघटना आक्रमक झाली आहे. सावजी हा केवळ एक व्यवसाय नसून अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असून त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेची जोड आहे. अशा व्यवसायाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे सावजी व्यवसायाशी संबंधित समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे सांगत तुकाराम मुंढे यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सावजी भोजनालय चालक आणि हलबा समाज युवा संघटनेने दिला आहे.
“सावजी ही विदर्भाची ओळख असून मागील दोन पिढ्यांपासून हलबा समाजातील कुटुंबे हा व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहेत. हा केवळ हॉटेल व्यवसाय नसून समाजाच्या परंपरेशी आणि संस्कृतीशी जोडलेला वारसा आहे. त्यामुळे सावजी नावाबाबत कोणतेही सर्वसाधारण किंवा आक्षेपार्ह वक्तव्य करणे योग्य नाही. सध्या सावजी नावाने अनेक हॉटेल असून मसाले बाजारात विकले जातात. मात्र सर्वच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सावजी भोजन तयार केले जाते, असे नाही. खरे अस्सल सावजी भोजनालयांमध्ये बाजारातील रेडिमेड मसाले किंवा तयार मिरची पावडरचा वापर केला जात नाही. सावजी मसाले घरातील महिलाच पारंपरिक पद्धतीने तयार करतात. त्यामुळे भेसळीचा प्रश्नच उद्भवत नाही,” असा दावा व्यावसायिकांनी केला.
“हलबा समाजाव्यतिरिक्त इतर अनेक जण सावजी नावाचा वापर करून हॉटेल व्यवसाय करतात. त्यामुळे जर अन्न व औषध प्रशासनाला अन्नाच्या गुणवत्तेबाबत शंका असेल, तर अशा ठिकाणी तपासणी करावी. संपूर्ण सावजी परंपरेलाच बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. खरे सावजी कोण आणि नावाचा गैरवापर कोण करत आहे, याची चौकशी प्रशासनाने करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
नागपूर आणि विदर्भात येणारे पर्यटक, लोकप्रतिनिधी, मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या आवडीने सावजी भोजनाचा आस्वाद घेतात. हिवाळी अधिवेशनाच्या काळातही अनेक आमदार आणि मंत्री सावजी भोजनासाठी येतात. अशा परिस्थितीत सावजी भोजनामुळे किती लोकांची तब्येत बिघडली, याची आकडेवारी प्रशासनाने जाहीर करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. तसेच तुकाराम मुंढे यांनी स्वतः पारंपरिक सावजी भोजनालयात येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि सावजी भोजनाचा अनुभव घ्यावा, असे निमंत्रणही संघटनेने दिले आहे.
दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही दखल न घेतल्यास तुकाराम मुंढे यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा सावजी भोजनालय व्यावसायिक आणि हलबा समाज युवा संघटनेने दिला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा