• Sun. Jun 7th, 2026

    जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी ठोस उपाययोजना करा  – पालकमंत्री अतुल सावे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 18, 2026
    जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी ठोस उपाययोजना करा  – पालकमंत्री अतुल सावे – महासंवाद

    नांदेड, दि. १८: जिल्ह्यात अलीकडे घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने अधिक दक्षता घ्यावी, तसेच शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    नांदेड शहरात महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवसांत घडलेल्या पाच खुनांच्या घटनांचा उल्लेख करत पालकमंत्री सावे यांनी ही बाब चिंताजनक असल्याचे नमूद केले. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

    शहर व जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर विशेष लक्ष ठेवावे, एमपीडीए अंतर्गत कारवाई वाढवावी, तसेच अचानक धाडी टाकून गुन्हेगारीला आळा घालावा, असेही त्यांनी सांगितले. अवैध वाळू उत्खनन, गुटखा, मटका व अंमली पदार्थांवर कठोर कारवाई करावी तसेच कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी स्थानिक गुप्तवार्ता वाढविण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    पोलीस विभागाच्या अडचणी शासन स्तरावर सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत, सीसीटीव्ही प्रकल्प, पदभरती, पोलीस वसाहत व पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्तावांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर प्रभावी उपाययोजना राबवून नागरिकांचा विश्वास दृढ करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

    यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी जिल्ह्यात मागील दीड वर्षातील गुन्हेगारीत झालेल्या घट व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. पुढील काळातही जिल्ह्यात शांतता राखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 20 ते 24 एप्रिल 2026 दरम्यान पालक व विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed