• Thu. Jun 18th, 2026
    Nagpur Crime : नागपूरमध्ये खाकीचा धाक संपलाय का? रात्रीच्या गस्तीदरम्यान थेट पीएसआयवर चाकूहल्ला करून पळवली त्यांचीच बुलेट

    Nagpur Crime News : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पीएसआय सचिन वाकलेकर यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपींनी त्यांची बुलेटही चोरून नेली. सीसीटीव्हीच्या आधारे नागपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत छिंदवाडा येथील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

    नागपूरमध्ये खाकीचा धाक संपलाय का? रात्रीच्या गस्तीदरम्यान थेट पीएसआयवर चाकूहल्ला करून पळवली त्यांचीच बुलेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिप्टी सिग्नल परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची ही गंभीर घटना असून या प्रकरणी पोलिसांनी वेगवान कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. महेंद्र, धर्मेंद्र आणि सोनू अशी अटकेतील आरोपींची नावे असून तिघेही २२ वर्षीय असून छिंदवाडा येथील रहिवासी आहेत. हे तिघेही सुमारे १५ दिवसांपूर्वी नागपुरात आले होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, कळमना पोलीस ठाण्यात कार्यरत पीएसआय सचिन वाकलेकर हे गुरुवारी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास एका होमगार्ड जवानासह डिप्टी सिग्नल परिसरात नियमित गस्त घालत होते. त्याचदरम्यान काही युवकांनी त्यांना ‘उडता हनुमान चौक’ परिसरात दुचाकीस्वारांमध्ये वाद झाल्याची माहिती दिली. अपघाताच्या कारणावरून सुरू झालेल्या या वादात स्थानिक नागरिकांनी एका संशयिताला पकडून ठेवले होते.

    पीएसआयच्या खांद्यावर वार

    ही माहिती मिळताच पीएसआय वाकलेकर तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होमगार्ड जवानाला त्या युवकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्याचे निर्देश दिले. मात्र, परिस्थिती अचानक बिघडली. वाद मिटवताना अचानक आरोपीने मागून येत पीएसआय वाकलेकर यांच्या खांद्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपींनी आणखी गोंधळ घालत घटनास्थळावरून पळ काढला. इतकेच नव्हे तर मुख्य आरोपी पीएसआय वाकलेकर यांची बुलेट मोटारसायकल हिसकावून घेत फरार झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यावरून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.

    Maharashtra TimesCrime News : पोटच्या अल्पवयीन लेकीला ऊसतोडणीला नेऊन नराधम पित्याचा वारंवार अत्याचार; हॉटेल चालकाचाही वासनांध प्रताप, अहिल्यानगरमधील गंभीर प्रकरण

    पीएसआयवर उपचार सुरु

    घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी वाकलेकर यांना तत्काळ भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लकडगंज येथील न्यू ईरा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    तिघांना अटक , बुलेट जप्त

    या प्रकरणानंतर नागपूर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत विविध पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिघा आरोपींना जेरबंद केले. तसेच चोरीस गेलेली बुलेट मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांवरच हल्ला होण्याच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास कळमना पोलीस करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा