• Sat. Jun 13th, 2026

    Crime News : पोटच्या अल्पवयीन लेकीला ऊसतोडणीला नेऊन नराधम पित्याचा वारंवार अत्याचार; हॉटेल चालकाचाही वासनांध प्रताप, अहिल्यानगरमधील गंभीर प्रकरण

    Crime News : पोटच्या अल्पवयीन लेकीला ऊसतोडणीला नेऊन नराधम पित्याचा वारंवार अत्याचार; हॉटेल चालकाचाही वासनांध प्रताप, अहिल्यानगरमधील गंभीर प्रकरण

    Minor Girl Assault In Jamkhed, Father Arrested : जामखेड तालुक्यात साडेतेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या पित्याने आणि एका हॉटेलचालकाने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या वैद्यकीय तपासणीत पीडिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळल्यानंतर हा प्रकार समोर आला.

    अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार (प्रतिकात्मक फोटो)(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर, अनिकेत यादव : जामखेड जामखेड तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी आणि बाप-लेकाच्या पवित्र नात्यालाच तडा देणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या साडेतेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या पित्याने तसेच एका हॉटेलचालकाने अत्याचार केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून पीडिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोक्सो आणि बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत.

    हॉटेल चालकाचा अत्याचार

    मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी संगमनेर तालुक्यातील आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये दिवाळीच्या सुट्टीदरम्यान ती आजी-आजोबा आणि वडिलांसोबत ऊसतोडणीसाठी जामखेड तालुक्यातील सरदवाडी परिसरात आली होती. याच काळात पाणी भरण्यासाठी हॉटेलवर जात असताना आरोपी जयदत्त सदाशिव कात्रजकर उर्फ नाना (रा. कुसडगाव) याने तिला जवळच्या शेतात नेऊन वारंवार अत्याचार केला. या प्रकाराची कुणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.

    पित्याचा वारंवार अत्याचार

    यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये कुटुंब बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सांगवी येथे ऊसतोडणीसाठी गेले असता, तिथेच पीडितेच्या जन्मदात्या पित्याने नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केल्याचे तपासात समोर आले.

    संपूर्ण प्रकार उघडकीस कसा आला?

    दरम्यान, एप्रिल २०२६ मध्ये वार्षिक परीक्षेसाठी पीडिता आश्रमशाळेत परतली असता शाळेकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. ९ एप्रिल रोजी झालेल्या वैद्यकीय तपासणीत ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर संगमनेर पोलिसांनी तत्काळ जामखेड पोलिसांशी संपर्क साधत पुढील कारवाई सुरू केली.

    दोन्ही आरोपींना अटक

    सपोनि. वर्षा जाधव यांनी पीडितेला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता या अमानुष अत्याचाराची धक्कादायक मालिका समोर आली. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने १४ एप्रिल रोजी रात्री दोन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने काल आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे करीत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा