• Tue. Jun 9th, 2026
    आगीत तीन कुटुंबीय दगावले, बचावलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, अख्खं गाव हळहळलं, एकाही घरात चूल पेटली नाही

    Nashik Farmer dies of Electric Shock : नाशिकमधील साकोरे गावातील दोन अत्यंत कष्टाळू आणि मनमिळावू व्यक्ती अकस्मात निघून गेल्याने गावात एकाही घरात चूल पेटली नाही

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, नाशिक : पांझण नदीपात्रात विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १६) नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे घडली. गावात चांगली प्रतिमा असणाऱ्या सुपरिचित व कष्टाळू दोन्ही शेतकऱ्यांच्या आकस्मित मृत्यूने अवघे साकोरे गाव गहिवरले. गुरुवारी साकोरे गावात चूलही पेटली नाही. दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबावर दुःखाची छाया पसरल्याने सांत्वन करणेही ग्रामस्थांना अवघड झाले होते.

    विजेचा तीव्र धक्का

    साकोरे येथील शिरीष पठाडे (वय ४४) व जगदीश खैरनार (वय ३८) हे दोन तरुण शेतकरी गुरुवारी पांझण नदीपात्रात शेतीचा विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते. मात्र, दोघांनाही विजेचा तीव्र धक्का लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त गावात पसरताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. याबाबत नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दोन्ही शेतकऱ्यांवर गुरुवारी सायंकाळी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. साकोरे गावातील दोन अत्यंत कष्टाळू आणि मनमिळावू व्यक्ती अकस्मात निघून गेल्याने गावात एकाही घरात चूल पेटली नाही. पठाडे आणि खैरनार कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे संपूर्ण नांदगाव तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी या दोन्ही शेतकऱ्यांची आपापल्या शेतात धावपळ सुरू होती. मात्र, कडाक्याच्या उन्हात पंप सुरू करण्याची धडपड करीत असताना तांत्रिक बिघाडामुळे त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.

    तेव्हा जीव वाचला, आता काळाने हिरावले

    २० वर्षांपूर्वी जगदीश यांच्या राहत्या झोपडीवर अचानक वीज पडून लागलेल्या भीषण आगीत ते गंभीर भाजले होते. त्या वेळी त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. या आगीत त्यांच्या घरातील तिघांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. सर्वांचे जीव वाचवण्यासाठी जगदीश पुढे होते.ते या घटनेत बचावले. मात्र, गुरुवारच्या घटनेत त्यांची प्राणज्योत मालवली.

    लेकीच्या लग्नाआधीच काळाचा घाला

    लेकीचा विवाह ठरल्याने शिरीष पठाडे यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. येत्या २६ एप्रिल रोजी त्यांच्या लेकीचा विवाह समारंभ होता. घरात त्याची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लेकीचे हात पिवळे होण्यापूर्वीच पठाडेंवर काळाने झडप घातली. वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्या लेकीसह पठाडे कुटुंबावर जणू आभाळच फाटले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा