• Sat. Aug 1st, 2026

    Pune News : वकिलाने विश्वासघात केला, कोर्टाने दिली एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, बारामतीतलं चक्रावणारं प्रकरण

    Pune News : वकिलाने विश्वासघात केला, कोर्टाने दिली एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, बारामतीतलं चक्रावणारं प्रकरण

    एका महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर पतीने नुकसना भरपाईसाठी प्रयत्न केले. या प्रकरणी नुकसान भरपाईसाठी महिलेच्या पतीची बाजू मांडणाऱ्या वकिलानेच तब्बल 10 लाख रुपये लाटल्याचं समोर आलं. या गंभीर प्रकरणाची दखल घेत कोर्टाने आरोपी वकिलाला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वकिलानेच आपल्या पक्षकाराचा विश्वासघात केल्याचे गंभीर प्रकरण बारामतीत न्यायालयाने उघड केले आहे. मोटार अपघातात पत्नी गमावलेल्या व्यक्तीला मिळालेल्या नुकसानभरपाईतून वकील फी म्हणून फक्त 1 लाख काढणार असल्याचे सांगत प्रत्यक्षात स्वतःच्या खात्यावर 10 लाख रुपये वळविणाऱ्या वकील बापू बाबुराव दिवेकर यांना बारामती न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

    न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, कोर्ट क्रमांक 5 चे न्यायमूर्ती टी. डी. इंगवले यांनी 31 जुलैला हा निकाल दिला. भारतीय दंड संहिता कलम 420 अंतर्गत आरोपी दोषी ठरला असून, दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे. दंडाच्या रकमेपैकी 20 हजार रुपये फिर्यादीच्या वारसांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब दत्तात्रय रणसिंग यांच्या पत्नीचा 2015 मध्ये अपघाती मृत्यू झाला होता.

    आरोपीच्या बँक खात्यात 10 लाख जमा झाल्याचे समोर

    नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यासाठी त्यांनी आरोपी वकिलावर विश्वास ठेवला. नुकसान भरपाईची रक्कम संयुक्त बँक खात्यात जमा झाल्यानंतर वकील फीच्या नावाखाली काही कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या. मात्र नंतर बँक नोंदीतून आरोपीच्या वैयक्तिक खात्यावर थेट 10 लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले.

    आरोपीने फसवणूक केल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

    सुनावणीदरम्यान बँकेची प्रमाणित कागदपत्रे, खात्यांचे विवरण, साक्षीदारांचे जबाब आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. या सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपीने फसवणूक केल्याचे संशयापलीकडे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.

    आरोपीने नुकसानभरपाईच्या 50 टक्के रक्कम फी म्हणून घेण्याचा करार असल्याचा दावा केला. मात्र त्या दाव्याला आधार देणारा कोणताही लेखी करार, पावती किंवा अधिकृत दस्तऐवज सादर करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावला.

    न्यायालयात निरीक्षणात नेमकं काय म्हटलं?

    न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले की, “वकील आणि पक्षकार यांच्यातील विश्वास हा न्यायव्यवस्थेचा पाया आहे. त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन आर्थिक लाभ मिळविणे हा गंभीर आर्थिक गुन्हा असून, अशा प्रकारच्या कृत्यामुळे न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण होतो.”

    विशेष म्हणजे, फिर्यादी बाळासाहेब रणसिंग यांचे मार्च 2026 मध्ये निधन झाले. त्यामुळे निकाल ते पाहू शकले नाहीत. मात्र त्यांनी दाखल केलेली तक्रार, पोलिसांनी गोळा केलेले पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या बळावर अखेर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला. या प्रकरणाचा तपास बारामती शहर पोलिसांनी केला.