लोकसभेत निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला. पण त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावरुन खासदार अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे या प्रचंड संतापल्या. त्यांनी निशिकांत दुबे यांच्यावर कारवाईची मागणी केली.
अरविंद सावंत काय म्हणाले?
“छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात झाशीची राणी लक्ष्मीबाईचा जन्म झाला. आता झाशी उत्तर प्रदेशात आहे. त्यावेळी बलवंतनगर होतं. मराठ्यांचं साम्राज्य होतं. झाशीची राणी मराठा होती. मराठी होत्या. अहिल्याबाई होळकर, ताराराणी महाराष्ट्राच्या होत्या. हा सर्व महाराष्ट्राचा इतिहास आहे. या पराक्रमी महिलांचा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रात 1279 मध्ये संत ज्ञानेश्वर यांची बहीण मुक्ताबाई यांनी चांगदेवाचं गर्वहरण केलं होतं. त्याला उपदेश दिला. हा आमचा महाराष्ट्र आहे.””जनाबाई आमच्या संत होत्या. परभणीच्या होत्या आणि मातंग समाजाच्या होत्या. कान्होपात्रा एक नर्तकीची कन्या होती जिने आयुष्यभर पाडुरंगाची सेवा केली. त्यांनी जे अभंग लिहिले, हा महाराष्ट्र आहे. या लोकांसाठी मी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या दोन ओळी बोलतो. अरे माणसा माणसा, कधीं व्हशीन माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस. लोभ काय आहे तर स्वार्थ आहे. या स्वार्थासाठी तुम्ही हे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. तुम्हाला हे विशेष अधिवेशन आता बोलवण्याची काय आवश्यकता होती?”
“आम्ही महिला आरक्षणाला विरोध केला का? 2023 मध्ये देखील मी बोललो होतो. महिलांच्या समर्थनार्थ सर्व विरोधी पक्ष उभा होता. तुम्ही विसरलात का? महाराष्ट्रात महिलांना शिक्षण देण्याची सुरुवात सावित्रिबाई फुले यांच्यापासून झाली. महिलांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केली. त्यांना त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आनंदी जोशी देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत आणि त्या महाराष्ट्राच्या आहेत. पंडिता रमाबाई मराठी होत्या. चित्रपटसृष्टीतील पहिली महिला दुर्गाबाई कामत महाराष्ट्राच्या होत्या.”
‘तुमचे डिलिमिटेशन बिल हे राजकारणासाठी’, सावंतांची टीका
“मला समजत नाही की इतके लोक बदलतात. पाच राज्यात निवडणूक सुरु असताना तुम्ही विशेष अधिवेशन बोलावलं. आता जरी विधेयक मंजूर झालं तरी ते 2029 मध्ये अंमलात येईल. मग 2027 मध्ये अधिवेशनाचं सत्र झालं असतं ना? या विधेयकाला कुणी विरोध केला होता का? तुमचं भाषण राजकीय आहे. पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू येथे महिला आरक्षणाचा ढोल वाजवायचा आहे. आम्ही महिला आरक्षणाच्या विधेयकाला तुम्ही डिलिमिटेशन बिल सोबत जोडलं आहे. त्यामुळे त्याला विरोध होत आहे. महिला आरक्षणाचं बिल आताच मंजूर करतो. डिलिमिटेशन बिल सोडा ना. तुमचे डिलिमिटेशन बिल हे राजकीय आहे”, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.
‘शिवसेनेने महिलांना महापौर केलं’
“आमच्या इतके मुंबई महापालिकेत आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महिला महापौर बनल्या. किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, आंबेकर, भरपूर महिला आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी महिला आरक्षण नव्हतं, खुला प्रवर्ग होता त्यावेळी शिवसेनेने महिलांना मुंबईचा महापौर बनवलं. हा आम्ही महिलांचा सन्मान करतो”, असं अरविंद सावंत म्हणाले.
‘तुमच्या ढोंगच्या विरोधात आम्ही लढतो’
“आपण मणिपूर कसं विसरतो? आपल्या मनात महिलांबद्दल इतका आदर आहे तर आज पुन्हा मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार सुरु झाले आहेत. हल्ले सुरु आहेत. निर्भया आम्ही विसरलो नाहीत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला बोलावलं नाही. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मदिनीदेखील नाही बोलावलं. तरीही जय श्रीराम. ढोंग आहे. या ढोंगच्या विरोधात आम्ही लढतो. तुम्ही सांगता काय आणि करता काय, याच्यात फरक आहे”, अशीदेखील टीका त्यांनी केली.
“महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहे. आमच्या महाराष्ट्राला कलंकीत केलं जात आहे. हे बिल आणलं तेव्हा मनात एकच गोष्ट येतो की, हे विधेयक आताच का मंजूर करायचं आहे? जून-जुलै महिन्यात मंजूर केलं जाऊ शकत नव्हतं? निवडणुकीच्या वेळी का? कारण तुम्हाला माहिती होतं की, निवडणुकीच्या काळात अनेक विरोधी पक्षाचे खासदार हजर राहू शकणार नाहीत. गैरहजर राहिले तर आपल्याला बिल पास करायला सोपं होईल”, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.
सावंत यांच्याकडून महाराष्ट्रातील मंत्र्याचा उल्लेख
“महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्याने म्हटलं की, माझ्याकडे महिला अधिकारी पाठवायचे नाहीत आणि ते महिलांच्या सन्माची गोष्ट करतात. महिलांच्या सुरक्षेची गोष्ट करा”, असं अरविंद सावंत यांनी सुनावलं.
अरविंद सावंत यांनी भाजपच्या ‘त्या’ नेत्यांची नावे घेतली
“सर, कुलदीप सेंगर कोणत्या पक्षाचे आहेत ते विसरु नका. बृजभूषण सिंह महिला सन्मान करणारे आहेत का?”, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. यानंतर भाजपच्या खासदारांमधील खासदार निशिकांत दुबे विरोध करु लागले. त्यावर अरविंद सावंत यांनी सवाल केले. “तुम्हाला बलात्कारी जास्त प्रिय आहेत का? त्याचे नाव येऊ द्या रेकॉर्डवर”, असं अरविंद सावंत म्हणाले.
निशिकांत दुबेंचा आक्षेप
निशिकांत दुबे यांनी संबंधित नेत्यांची नावे रेकॉर्डमधून काढण्याची मागणी केली. त्यावर लोकसभेचे तालिका अध्यक्ष जगदम्बिका पाल यांनी त्यांची मागणी मान्य केली. असा कुणावर आरोप केला जाऊ शकत नाही, असं ते म्हणाले. त्यावर अरविंद सावंत यांनी आक्षेप घेत संबंधित नावे रेकॉर्डमध्ये घ्यावेत, अशी मागणी केली. यानंतर निशिकांत दुबे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.
निशिकांत दुबे यांचं आदित्य ठाकरेंबद्दल वक्तव्य
“हे जर कुलदीप सेंगर आणि बृजभूषण सिंह यांची बात करत असतील तर आदित्य ठाकरे यांचीदेखील बात होईल. त्यांनीदेखील हिरोईनला विष देवून मारुन टाकलं”, असं धक्कादायक वक्तव्य निशिकांत दुबे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर अरविंद सावंत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे संतापल्या
“हे चुकीचं आहे. ह्यांना असं बोलण्याचा अधिकार नाही. ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हे काय आहे?” असा सवाल करत अरविंद सावंत संतापले. तसेच “आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. ते असं बोलू शकत नाहीत”, अशा शब्दांत सुप्रिया सुळ यांनीदेखील संताप व्यक्त केला. यावेळी वातावरण प्रचंड तापलेलं होतं. लोकसभेत गोंधळ झाला. तालिका अध्यक्षांनी यावेळी निर्वाळा केला.
अरविंद सावंत यांचा दुबेंना इशारा
“मी गुन्हेगारांचं नाव घेतलं, जे जेलमध्ये गेले. कुणाला बदनामा करायचं असतं तर मी तडीपारचं नाव घेऊ का? की तोण तडीपार होतं? एपस्टिन फाईलचं नाव घेऊ का? मला सांगाना. माझं तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत. लाईन आहे. त्यांनी माफी मागावी”, असं अरविंद सावंत यांनी सुनावलं.
