• Sun. Sep 13th, 2026

उष्णतेच्या लाटांबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या विशेष भागातून जनजागृती – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Apr 16, 2026
उष्णतेच्या लाटांबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या विशेष भागातून जनजागृती – महासंवाद

मुंबई, दि. १६ : राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, तसेच उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या मानक कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती देणारा विशेष भाग प्रसारित करण्यात येत आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमाचा हा विशेष भाग शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही तो उपलब्ध राहणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले आहे.

उष्णतेचा प्रभाव असलेल्या देशातील दहा प्रमुख राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होत असून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. विशेषतः बाहेर काम करणारे डिलिव्हरी कर्मचारी, मजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्या सुरक्षेसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी)मध्ये महत्त्वपूर्ण उपाययोजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत.दिवसा काम टाळता न येणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी तीन स्वतंत्र एसओपी तयार करण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांच्या सखोल अभ्यासावर आधारित या एसओपीमध्ये बाहेर काम करणारे असंघटित कामगार, खाणकामगार तसेच उष्णतेला तोंड देणाऱ्या घरांच्या संकल्पनांचा समावेश आहे.

एप्रिल, मे आणि जून या तीव्र उष्णतेच्या काळात जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांमार्फत या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. या कालावधीत नागरिकांनी कशा प्रकारे दक्षता घ्यावी, याची सविस्तर माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

0000

जयश्री कोल्हे/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed