• Sat. Jun 6th, 2026
    Heat Wave : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट, सरकार सतर्क, 3 व्यापक SOP जारी, काय-काय केलं जाणार?

    राज्यभरात तापमानात वाढ होत आहे. आगामी काळात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना तापमान वाढीबाबतचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य शासनाकडून तीन व्यापक एसओपी जारी करण्यात आल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्य शासनाने राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) रंग-कोडेड उष्णता सतर्कतांच्या अनुषंगाने उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचे, विशेषतः असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी तीन व्यापक मानक कार्यपद्धती (SOPs) जारी केल्या आहेत. उष्णता-संबंधित आजार आणि मृत्यू कमी करण्यासाठी या उपाययोजना उपयुक्त ठरणार आहेत. विशेषतः अनौपचारिक कामगार, खाण कामगार आणि कमी उत्पन्न गटांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.या एसओपींचा मुख्य भर 15 उच्च-उष्णता-जोखमीच्या जिल्ह्यातील बाहेरील अनौपचारिक कामगार, चंद्रपूरमधील कोळसा खाण कामगार तसेच उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माण आणि वसाहतींवर आहे. लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड हे जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत.

    पहिल्या SOP मध्ये काय?

    पहिल्या एसओपीमध्ये रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कामगार, रिक्षाचालक आदी बाहेर काम करणाऱ्या घटकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. आयएमडीच्या पिवळ्या, केशरी आणि लाल सतर्कतांनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, पाण्याचे ब्रेक, पाणी बूथ, ओआरएस वितरण, सावली व्यवस्था आणि आरोग्य सुविधा मजबूत करणे यासारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

    दुसऱ्या SOP मध्ये काय?

    दुसरी एसओपी चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी असून, उष्णता ताण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करते. यामध्ये थंड विश्रांती केंद्रे, पाणी पुरवठा, वायुवीजन, कामाचे नियोजन, जॉब रोटेशन, उष्णता आजार ओळख प्रशिक्षण आणि महिला कामगारांसाठी विशेष सुविधा यांचा समावेश आहे.

    तिसऱ्या SOP मध्ये काय?

    तिसऱ्या एसओपीमध्ये उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माणाचा समावेश असून, तत्काळ, मध्यम व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांद्वारे घरांची थर्मल सुधारणा, कूल रूफ, हरित क्षेत्रे आणि हवामान-संवेदनशील नियोजन यावर भर देण्यात आला आहे.

    उच्च-उष्णता-जोखमीच्या जिल्ह्यांमध्ये उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माण व वसाहती मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सल्ला आहे. या एसओपी तात्काळ, मध्यम-मुदती (1-3 वर्षे) आणि दीर्घ-मुदती अशा तीन-स्तरीय उपाय योजनावर आधारित आहे:

    तात्काळ उपाययोजनामध्ये : उष्णता जोखीम नकाशा, असुरक्षित गटांचे लक्ष्यीकरण, जनजागृती, थंडी केंद्रे, घरांची कमी खर्चाची थर्मल सुधारणा (रिफ्लेक्टिव्ह छप्पर, सावली, वेंटिलेशन).

    मध्यम-मुदती उपाय: पीएमएवाय, गृहनिर्माण योजना, बिल्डिंग बाय-लॉज आणि मास्टर प्लॅनमध्ये उष्णता-प्रतिरोधक डिझाइन (कूल रूफ, ग्रीन स्पेस) समाविष्ट करणे.

    दीर्घ-मुदती उपाय: स्टेट बिल्डिंग कोड, क्लायमेट-सेन्सिटिव्ह झोनिंग आणि सर्वांसाठी समान तापमान सुविधा यांचा समावेश आहे.

    या तीनही एसओपीमध्ये विभागीय समन्वय, आरोग्य केंद्रे आणि कामगारांच्या अभिप्रायावर आधारित नियमित पुनरावलोकन तसेच अनौपचारिक कामगारांच्या प्रतिनिधित्वावर भर दिला आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष (१०७७), रुग्णवाहिका (१०८), पोलीस हेल्पलाइन (११२/१००) आणि इतर महत्त्वाचे संपर्क क्रमांकही प्रसारित करण्यात आले आहेत.

    या एसओपींची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना विभाग, म्हाडा, सिडको, स्थानिक स्वराज्य संस्था आदी प्रमुख विभागांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

    एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करावी, गिरीश महाजन यांचे आदेश

    देशातील दहा प्रमुख उष्ण राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचाही समावेश आहे. वातावरणातील बदलांमुळे तापमान सातत्याने वाढ होत असून अनेक भागात तापमान ४७ ते ४९ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत आहे. राज्यात वाढत्या उष्णतेमुळे दक्षता घेण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना देण्यात आल्या आहेत. वाढत्या उष्णतेच्या अनुषंगाने जनजागृतीसाठी विशेष मोहिमाही राबवण्यात येणार असून या एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

    एसओपी तयार करण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न, प्रधान सचिव विनिता सिंगल यांची प्रतिक्रिया

    वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने सविस्तर तीन स्वतंत्र मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी दिली. सकाळी ११ ते दुपारी ४ या तीव्र उन्हाच्या कालावधीत बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत या एसओपीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले आहे.

    या उपाययोजना तयार करताना विविध खाण कामगार व खाणींमध्ये काम करणारे कर्मचारी, बाहेर काम करणाऱ्या डिलिव्हरी कर्मचारी, मजूर कामगारांसाठी, तसेच १५ उच्च-उष्णता- जोखमीच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटांना सामोरे जाण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे. जळगावसारख्या भागांमध्ये तापमान 50 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून करण्यात आल्या आहेत.

    मागील सहा महिन्यांपासून अभ्यास करून असंघटित क्षेत्रातील कामगार, खाणकामगार तसेच उष्णतेला तोंड देणाऱ्या घरांच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. मे-जून महिन्यात तापमान वाढीची शक्यता लक्षात घेऊन या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार असून जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांमार्फत त्यांची अंमलबजावणी केली जाईल. दरवर्षी या एसओपींचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात येतील, जेणेकरून उपाययोजना अधिक प्रभावी होतील, असेही श्रीमती सिंगल यांनी स्पष्ट केले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा