• Sun. Jun 7th, 2026
    जायकवाडीचे पाणी नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचले, Chhatrapati Sambhajinagar शहराची तहान भागणार, 30 वर्षांच्या संघर्षाला न्याय मिळणार

    छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडी धरणाचे पाणी नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचले आहे. नक्षत्रवाडीपर्यंत पाणी पोहोचताच या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्माचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा आनंद शब्दांमध्ये सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. पुढच्या काही महिन्यांतच हे पाणी शहरातील घराघरापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर मोठा तोडगा निघणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. शहराच्या पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या समांतर पाणी पुरवठा योजनेत मोठी प्रगती झाली आहे. जायकवाडीचे पाणी आता नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचले आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या समांतर पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर नक्षत्रवाडी येथील फिल्टर प्लँटपर्यंत पोहोचले आहे. तब्बल ३८ किलोमीटरचा प्रवास करत हे पाणी आज नक्षत्रवाडी येथील फाउंटनमधून बाहेर पडले. फाउंटनमधून पाणी येताच या योजनेचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला. दरम्यान, जायकवाडीचे पाणी नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचले असले तरी नागरिकांच्या नळापर्यंत हे पाणी पोहोचण्यासाठी अजून काही महिने लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    एमजेपी अधिकारी मनिषा पलांडे यांनी यावेळी या प्रकल्पाबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. “आपण गेल्या वर्षभरापासून WTP पर्यंत पाणी आणण्याचा प्रयत्न करत होतो. पण पाण्याला देखील 14 एप्रिललाच यायचं होतं आणि छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना न्याय द्यायचा होता. जनता 30 वर्षांपासून आतुरतेने प्रतिक्षा करत होती. या सगळ्या प्रवासात आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं खूप खंबीर पाठबळ लाभलं. कारण अनेकदा तारखा पुढे जात होत्या. काही तांत्रिक अडचणी येत होत्या. प्रशासकीय अडचणी येत होत्या. पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला खूप ताकदीने पाठिंबा दिला. प्रोत्साहन दिलं, म्हणून आज आपण हा दिवस पाहतोय”, असं अधिकारी मनिषा पलांडे म्हणाल्या.

    ‘शब्दांमध्ये आनंद व्यक्त करु शकत नाही’

    “आम्हाला चांगली प्रशासकीय मदत झाली. पाणी परवठ्याचे सेक्रेटरी, विभागीय आयुक्त, पालकमंत्री अशा सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. आमच्यासह त्यांनीदेखील संयमाने या सर्व प्रक्रियेचा प्रवास केला. आज आपण हा सुंदर दिवस पाहत आहोत. खूप आनंदी आहे. हा आनंद शब्दांत वर्णन करु शकत नाहीत”, अशी भावना मनिषा पलांडे यांनी व्यक्त केली.

    काम कुठपर्यंत आले?

    “WTP मध्ये काही किरकोळ कामे राहिली आहेत. महत्त्वाचे आहे ते क्लोरीनेटर रुम. क्लोरीनेटर रुम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लायसन्स घ्यावे लागतं. त्यानंतरच आपण डिसइम्पेक्टेड पाणी MBR ला घेऊ शकतो. MBR च्या पुढे आपलं जे पाईपचे नेटवर्क आहे ते आम्ही 1500 ते 2000 च्या लाईनवर लक्ष देत आहोत”, अशी माहिती त्यांनी दिली.

    “सध्या हाय लेव्हल एमबीआरचा ओव्हरफ्लो पाईप वगळता बाकी काम झालेलं आहे. 1500 चे गॅपही झालेले आहेत. पण त्यावर आपल्याला विविध प्रकारचे वॉल लावावे लागतील. हे लावल्यानंतरच आपण त्या लाईनमध्ये पाणी घेऊ शकतो. काही किरकोळ गॅप राहिले आहेत. ते एक-दोन महिन्यात पूर्ण झाले की आपण हाय लेव्हल एमबीआर घेऊ शकतो”, असं मनिषा पलांडे यांनी सांगितलं.

    “लो लेव्हल एमबीआरचा गॅप पूर्ण करायला एक महिन्याचा कालावधी लागेल. तरीसुद्धा शहराचा आता जो लो लेव्हल एमबीआर आहे त्याला आपण एमबीआरच्या पाण्याने बॅकअप देऊ शकतो. त्यामुळे त्या लाईनवर जी पाण्याची तूट होती ती भरु शकतो. काही कालावधी या कामांना लागेल. दोन-अडीच महिने लागतील. झोननुसार काम पूर्ण करायला आणखी काही कालावधी लागेल”, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.

    घरोघरी पाणी कधीपर्यंत पोहोचेल?

    यावेळी पत्रकारांनी मनिषा पलांडे यांना लोकांच्या घरातील नळापर्यंत पाणी कधीपर्यंत पोहोचेल? असा महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “लोकांच्या नळाला पाणी यायला अडीच ते तीन महिने लागणार आहेत. पूर्ण योजनेच्या 83 टक्के काम पूर्ण झाले आहे. आम्ही टप्प्या-टप्प्याने पाणी सुरु करु”, अशी माहिती मनिषा पलांडे यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा