मुलाला पोहायला शिकवण्याचे स्वप्न उराशी बाळगून नदीकाठी गेलेल्या एका पित्यावर काळाने घाला घातला. अहिल्यानगरमधील देवदैठण येथे पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर ओढताना पित्याचा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला.
‘चल बाळा, तुला पोहायला शिकवतो’ म्हणणारा बाप नदीतच हरवला; पोटच्या गोळ्यासाठी प्राणांची आहुती दिली, वाटसरूच्या रूपाने देव धावला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, श्रीगोंदा: अहिल्यानगमधून अतिशय वेदनादायी घटना समोर आली आहे.देवदैठण येथील शांत नदीकाठ रविवारी एका क्षणात हंबरडा फोडणाऱ्या शोकांतिकेचा साक्षीदार ठरला. मुलाला पोहायला शिकवण्यासाठी गेलेल्या पित्याचा आनंद काही क्षणांतच दुर्दैवात बदलला. स्वतःच्या मुलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नातच पित्याने आपले प्राण गमावले, तर एका धाडसी वाटसरूमुळे चिमुकल्याला नवजीवन मिळाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकी घटना काय?
अमित रंगनाथ साठे (वय ४०) हे आपल्या ९ वर्षीय मुलगा साहीलसोबत सिद्ध नदीवरील केटी वेअर परिसरात गेले होते. पाण्यात उतरल्यावर सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होते. मात्र, अचानक पाण्याची खोली वाढल्याने दोघेही नियंत्रण गमावून बुडू लागले. काही क्षणांतच परिस्थिती भीषण झाली. याच वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुधीर धोत्रे यांनी प्रसंगावधान दाखवत क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. जीवाची पर्वा न करता त्यांनी साहीलला बाहेर ओढले आणि मृत्यूच्या दारातून परत आणले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे एका निरागस जीवाला नवसंजीवनी मिळाली.
अमित साठे यांना वाचवण्यासाठी जवळपास अर्धा तास पाण्यात शोध घेतला
दरम्यान, स्थानिक तरुण नवनाथ जाधव यांनीही अमित साठे यांना वाचवण्यासाठी जवळपास अर्धा तास पाण्यात शोध घेतला. मात्र, पाण्याची प्रचंड खोली आणि वाढता प्रवाह यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नदीकाठी मोठी गर्दी झाली. बेलवंडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रायगव्हाण येथील एकलव्य संघटनेच्या बचाव पथकाने अथक प्रयत्न करून अखेर अमित साठे यांचा मृतदेह बाहेर काढला. या बचावकार्यात डिजास्टर रिस्क्यू फोर्स आणि रांजणगाव एमआयडीसी अग्निशामक दलानेही मोलाची साथ दिली.
गावकऱ्यांमध्ये हळहळ
आज देवदैठण गावात हळहळ, वेदना आणि कृतज्ञतेच्या मिश्र भावना आहेत. एका बाजूला साहील वाचल्याचा दिलासा, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या डोक्यावरून कायमचे हरपलेले बापाचे छत्र या दोन्ही भावना गावकऱ्यांच्या मनाला चटका लावत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा