Kalyan Murbad Accident : कल्याण-मुरबाड मार्गावरील पांजरा पुलावर सिमेंट मिक्सर आणि ईको टॅक्सीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महसूल अधिकाऱ्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.
पांजरा पुलावर काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, रायते येथील पांजरा पुलावर सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. ईको गाडीतून मुरबाडमधील काही रहिवासी कल्याणच्या दिशेने जात होते. याच दरम्यान पांजरा पुलावर समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एक आजी आश्चर्यकारकरीत्या बचावल्या आहेत.
एकाच कुटुंबातील तिघांसह महसूल अधिकाऱ्याचा अंत
प्रवाशांनी भरलेल्या ईको कारला झालेली धडक इतकी भीषण होती की, कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या कारमध्ये एकूण १२ प्रवासी होते, त्यापैकी ११ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली. या अपघातात मृतांची नावे आता समोर येत आहेत; ज्यामध्ये प्रशांत चंदने, जिजा गोविंद केंबरे, भूषण घोरपडे, अनंत पवार, दीपक गवळी आणि गणपत जेतू मदे यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे. तसेच, मुरबाड येथे सर्कल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले महसूल अधिकारी भूषण घोरपडे यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
Ladki Bahin Yojana: ई-केवायसीसाठी आमिषाला बळी पडू नका! लाडक्या बहिणींना मंत्री अदिती तटकरेंचे आवाहन
स्थानिकांची मदतीसाठी धाव
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम स्थानिकांनी अत्यंत जड अंतःकरणाने केले. टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर केला नसला तरी, ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट
हा अपघात नेमका कशामुळे झाला? चालकाचा ताबा सुटला की वेगाचा अतिरेक नडला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता. एका गंभीर जखमी प्रवाशावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
