• Fri. Sep 4th, 2026

भंडारा-भामचंद्र गडाच्या सद्यस्थितीचा अहवाल महिनाभरात सादर करा – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 4, 2026

मुंबई, दि. ४ : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ज्या भूमीत तपश्चर्या केली, त्या देहूजवळील भंडारा-भामचंद्र गडाच्या सद्यस्थितीचा सर्वंकष अभ्यास करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

भंडारा व भामचंद्र डोंगर परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावा तसेच या परिसरात सातत्याने होत असलेले अवैध उत्खनन आणि बांधकामे कायमस्वरूपी थांबवावीत. यासाठी शासनाने २०११ मध्ये काढलेली राज्य संरक्षित स्मारकाची अधिसूचना तातडीने लागू करावी, अशी मागणी तपोभूमी संरक्षक संघर्ष समितीने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक झाली.

या बैठकीस तपोभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांच्यासह समितीचे सदस्य, संबंधित जिल्हाधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, पोलीस, एमआयडीसी तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पुरातत्व विभागाने २०११ मध्ये राज्य संरक्षित स्मारकाबाबत अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती दिली. २०१७ मध्ये त्यामध्ये काही बदल सुचवून प्रस्ताव विधि व न्याय विभागाने परत पाठविला होता. त्यानुसार पुरातत्व विभागाने २०२५ मध्ये आवश्यक सुधारणा करून नवीन प्रस्ताव विधि व न्याय विभागाकडे सादर केला असल्याचे स्पष्ट केले.

भंडारा-भामचंद्र गड परिसरातील उत्खननाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. उत्खननाबाबत संयुक्त समिती गठित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

भंडारा-भामचंद्र गडाच्या संपूर्ण परिसराशी राज्य शासनाच्या विविध विभागांचा संबंध येत असल्याने सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून निर्णय घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुख्य सचिवांना सूचना देऊन, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून परिसराच्या सद्यस्थितीचा सर्वंकष अभ्यास करावा आणि एका महिन्याच्या आत सद्यस्थिती अहवाल सादर करावा, असे सांगितले.

या कार्यवाहीसाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधावा, असेही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी निर्देशित केले.

0000

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed