• Fri. Sep 4th, 2026

Nagpur News: शेतकऱ्यांच्या नावे 74 कोटींचे कर्ज; नुकसानभरपाईच्या आमिषाने फसवणूक, मास्टरमाइंड अटकेत, प्रकरण काय?

Nagpur News: शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन ७३ कोटी ८३ लाख रुपयांचे कृषी कर्ज उचलल्याचा प्रकार उघडकीस आले आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, नागपूर: शेतकऱ्यांच्या नावे भारतीय स्टेट बँकेकडून तब्बल ७४ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या सूत्रधाराला नागपूर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने सापळा रचून रेल्वेस्थानकावर अटक केली. सचिन खुशाल कारमोरे (वय ४०, रा. नेरी, ता. मोहाडी, जि. भंडारा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि त्याचे साथीदार नागपूर जिल्ह्यातील गरीब व अशिक्षित शेतकऱ्यांना हेरत होते. शासनाकडून शेतपिकांच्या नुकसानीपोटी दहा हजार रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखवून ते शेतकऱ्यांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, सात-बारा उतारे यांसह आवश्यक दस्तऐवज घेत होते. त्यानंतर इंग्रजीतील कागदपत्रांवर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आणि अंगठ्याचे ठसे घेतले जात होते. याच कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलण्यात आले.

Maharashtra TimesNagpur Crime : मध्यरात्री तब्येत बिघडली, रुग्णालयात पोहोचण्याआधीच प्राण सोडला, नवऱ्याचा भलताच बनाव; बायकोच्या मृत्यूचं गूढ उकललंसचिन आणि त्याच्या साथीदारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मौदा शाखेतून ५४ कोटी ६९ लाख ४२ हजार ८५० रुपये, तर रामटेक शाखेतून १९ कोटी १३ लाख ५० हजार रुपये, असे एकूण ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. ही रक्कम बनावट कंपन्यांच्या खात्यांत वळती करण्यात आली. कर्जवसुलीसाठी बँकांनी संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे सोपविला. पोद्दार आणि अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हेशाखेच्या उपअधीक्षक पूजा गायकवाड, निरीक्षक योगेश कामाले आणि त्यांच्या पथकाने सचिन व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला. सचिन बुधवारी रेल्वेने बाहेर जाणार असून तो नागपूर रेल्वेस्थानकावर असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

Maharashtra TimesAmravati News: बस कंडक्टरची ज्येष्ठाला मारहाण; स्मार्ट कार्ड अ‍ॅक्टिव्ह नसल्याची ‘शिक्षा’, अमरावती-अकोट एसटी बसमधील घटनेनं संतापसचिन धान घोटाळ्यातीलही आरोपी

सचिन कारमोरे हा भंडारा, गडचिरोली आणि अहेरी येथील कोट्यवधी रुपयांच्या धान घोटाळ्यातीलही आरोपी आहे. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा