पुण्यातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट असलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला आता वेग येणार आहे. राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
कात्रज–कोंढवा हा मार्ग शहरातील दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा असल्याने येथे दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत आहे. सध्या या रस्त्यावर ताशी सुमारे १५ हजारांहून अधिक वाहनांची वर्दळ असून त्यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. बोपदेव घाट आणि दिवे घाटमार्गे येणारी बहुतांश वाहतूक याच मार्गावर अवलंबून असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूण ८४ मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील हा पहिला टप्पा असून जून २०२६ पर्यंत तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी ३.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर भू-संपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
पहिला टप्पा अन् निधी
पहिल्या टप्प्यात १२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौरस मीटर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. प्रत्यक्ष जागेवर बॉण्ड्री मार्किंग, तसेच झाडांची मोजणी सुरू झाली असून विविध विभागांमध्ये समन्वय साधत ही प्रक्रिया राबवली जात आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त समिती यावर लक्ष ठेवून आहे.
Beed Accident : व्यवसायातून घर सावरणार होता पण नियतीला ते मान्य नव्हतं, शिवाई बस-दुचाकीच्या धडकेत एकुलता एक लेक गेला; आई-वडिलांचा आक्रोश
या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून सुमारे ₹१४० कोटी, तर महापालिकेकडून सुमारे ₹३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भू-संपादनासाठी आवश्यक १०० टक्के निधी जमा करण्यात आल्याने कामाला आर्थिक बळ मिळाले आहे.
प्रकल्पाचे ३२ टक्के काम पूर्ण
रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंना सर्विस रस्ते, पावसाळी वाहिन्या तसेच माऊली नगर येथे ग्रेड सेपरेटर उभारला जाणार आहे. अंतिम आराखड्यात सायकल ट्रॅक, फूटपाथ, पार्किंग आणि युटिलिटी डक्ट यांचा समावेश असेल. दरम्यान, National Highways Authority of India (NHAI) मार्फत राजस चौक येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सुमारे ४०० मीटर लांबीचे सर्विस रस्ते विकसित करण्यात येत आहेत. सध्या प्रकल्पाचे सुमारे ३२ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने सुरू आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कात्रज–कोंढवा मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
