• Fri. Sep 11th, 2026

स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे साह्य घेणारा कौशल्य विकास विभाग राज्यात प्रथम – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Apr 11, 2026
स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे साह्य घेणारा कौशल्य विकास विभाग राज्यात प्रथम – महासंवाद

मुंबई दि. ११: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात भारतीय सल्लागार कंपन्यांना नेमण्याचे धोरण आखले असून यासंदर्भात शासन निर्णय जारी झाला आहे. या निर्णयाची  राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे सर्वात आधी अंमलबजावणी होत आहे. यासंदर्भात मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी देशी सल्लागार कंपनीच्या सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत कौशल्य विकास विभागाला पत्र ही लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य असून कौशल्य विभाग याची पहिल्यांदा अंमलबजावणी करत असल्याचा आनंद असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त कौशल्य विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यभरातील आदिवासी आणि दुर्गम भागात नियम शिथिल करून 300 चौरस फूट जागेत महात्मा जोतिबा फुले कौशल्य विकास केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शासनाने समाविष्ट केलेल्या भारतीय सल्लागार  कंपन्यांची सेवा घेणार आहे.

महात्मा जोतिबा फुले कौशल्य विकास केंद्र चालविण्यासाठी सल्लागारांच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, छत्रपती संभाजीनगर, सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्च अँड गव्हर्नन्स, मुंबई, सेवा सहयोग फाऊंडेशन, पुणे आणि मुंबई येथील विवेक व्यासपीठ, मुंबई या सूचिबद्ध(एम्पॅनलमेंट)संस्थांना देण्यात यावे, अशी सूचना कौशल्य विभागाला या पत्रात करण्यात आली आहे.

मंत्री लोढा यांनी सांगितले की,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव भारताच्या संकल्पनेत स्वदेशीला विशेष महत्त्व दिले आहे. त्यामुळेच मेक इन इंडियामुळे भारतीय उद्योजकांचा आत्मविश्वास वाढला असून भारतीय दर्जेदार उत्पादने जगभरात लोकप्रिय होत आहेत. हाच स्वदेशीचा नारा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अमलात आणला आहे.  विदेशी सल्लागार कंपन्या ऐवजी आता प्रशासनाच्या सहकार्यासाठी भारतीय सृजनशील तरुण पुढे येणार आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेचा खऱ्या अर्थाने सन्मान होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने भारतीय तरुणांच्या संशोधनात भारतीयत्वाची सांगड दिसून येणार असून स्वदेशी सल्लागार कंपन्या जगभरात भरारी घेण्यासाठी सज्ज होणार आहेत.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed