• Sat. Jun 6th, 2026
    Chandrashekhar Bawankule : ‘शिंदे-फडणवीस हे सख्ख्या भावासारखे; फोडाफोडी करणे आमच्या रक्तात नाही’, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

    “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सख्ख्या भावासारखे एकत्रपणे सरकारमध्ये काम करत आहेत. महायुती सरकार मजबूत आहे. तसेच फोडाफोडी करणं हे आमच्या रक्तात नाही”, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अकोला येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख केला जातोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांना आपल्या पक्षात प्रवेश देण्यासाठी हालचाली सुरु असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. पण या वृत्ताचं खंडन ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे. तर दुसकीकडे भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महायुतीत शिवसेना आणि भाजप यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन या चर्चांना फोडणी मिळाली होती. पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे-फडणवीस हे सख्ख्या भावासारखे एकत्रपणे काम करत असल्याचं म्हटलं आहे.

    “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही सख्ख्या भावासारखे अत्यंत मजबूतीने महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत आहेत. अत्यंत विश्वासाने आमचं सरकार काम करत आहे. फोडाफोडी करणे आमच्या रक्तात नाही. आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोकं आहोत. खरंतर हा धर्म ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी तोडला. हा धर्म खासदार संजय राऊत यांनी तोडला, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

    ‘ठाकरे सरकारच्या काळात आमदारांमध्ये अविश्वासाचं वातावरण होतं’

    “आमच्या महायुतीसोबत फारकत घेऊन उद्धव ठाकरे हे काँग्रेसकडे गेले. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना ज्या पद्धतीचं अविश्वासाचं वातावरण उद्धव ठाकरे सरकारमध्ये झालं होतं, त्यामुळे त्यांचे आमदार निघून गेले. तसं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार नाही. तसं एकनाथ शिंदे यांचं सरकार नाही. 217 आमदारांचं प्रचंड मजबुतीचं सरकार महाराष्ट्रात आहे, जे एक दिलाने काम करत आहे”, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

    ‘खासदारांवर शंका घेणं चुकीचं’

    “कोणत्याही पक्षाचा आमदार कुणाला भेटला तर त्यात काहीही राजकारण नसतं. अनेकवेळा खासदार आपल्या मतदारसंघांची कामे करण्यासाठी सरकारकडे येतात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले असतील तर त्यांच्या मतदारसंघाच्या विकासकामांच्या विषयासाठी आले असतील. त्यावरुन त्यांच्यावर शंका घेणं चुकीचं आहे”, असंदेखील मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलं.

    ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ योजना काय?

    अकोलाच्या मूर्तीजापूर तालुक्यातील लाखपूरी येथील श्री लक्षेश्वर संस्थान सभागृह येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील आमच्या सरकारच्या माध्यमातून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व योजना’ आम्ही तयार केली. संपूर्ण राज्यात आज 10 तारखेला 450 पेक्षा जास्त शिबिर होत आहेत. यानंतरचा दुसरा टप्पा 17 एप्रिलला आहे. तिसरा टप्पा 8 मे ला आहे. चौथा टप्पा 15 मे ला आहे. यापूर्वी मागच्या दोन शिबिर झाले. एक 9 मार्चला झाले. दुसरे 16 मार्चला झाले आहेत”, अशी माहिती बावनकुळेंनी दिली.

    “या सर्व शाळा शिबिरांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या 48 योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत घरपोच मिळवून देणे हा उद्दीष्ट आहे. पणन रस्त्यापासून ते तुकडेबंधी कायद्यापर्यंत, पट्टे वाटपापासून ते स्वामित्वापर्यंत, या सर्व योजनांचे काम आम्ही करतो आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे. अकोला जिल्ह्यातील पालकमंत्री आणि सर्व आमदारांच्या मदतीने 25 हजार लाभार्थ्यांना तीन शिबिरातून लाभ दिला. यापुढच्या दोन शिबिरांमध्ये किमान 25 हजार कुटुंबाना योजना मिळवून देण्याचे प्रयत्न आहेत”, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा