• Sat. Jun 6th, 2026
    Mumbai Metro : मेट्रोचा प्रवास आता होणार स्वस्त; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी तिकिटांमध्ये 25 टक्के सवलत, काय आहे ही ऑफर?

    मुंबई मेट्रो 3 मधून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी प्रवासात मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. 25 टक्क्यांपर्यंतची ही सवलत नेमकी कशी मिळवायची?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईची लाइफलाईन असलेल्या लोकलनंतर आता मुंबईकरांची पसंती ‘मेट्रो 3’ (आरे ते कफ परेड) मार्गिकेला मिळत आहे. जर तुम्हीही या मेट्रोने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या खिशाचा विचार करून प्रवास सवलतींचे नवे दरवाजे उघडले आहेत. यामुळे आता मुंबईकरांचे पैसे तर वाचणारच आहेत, पण प्रवासही अधिक सुखकर होणार आहे.

    विद्यार्थ्यांना डिस्काउंट!

    शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी मेट्रोने मोठा निर्णय घेतला आहे. आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासावर तब्बल 25 टक्के सवलत मिळणार आहे. तुम्ही 45 फेऱ्यांचा पास घ्या किंवा 60 फेऱ्यांचा मासिक पास, दोन्हीवर ही सवलत लागू असेल. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांवरील आर्थिक ओझे मोठ्या प्रमाणावर हलके होणार आहे.

    पर्यटकांसाठी ‘अनलिमिटेड’

    मुंबई शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. या पर्यटकांना दक्षिण मुंबईचे सौंदर्य न्याहाळता यावे, यासाठी मेट्रोने ‘वन डे’ आणि ‘थ्री डे’ पासची सुविधा आणली आहे. यामध्ये एक दिवसाचा पास तुम्हाला केवळ 280 रुपये देऊन मिळणार आहे. यामध्ये तुम्ही दिवसभर कितीही वेळा मेट्रोने प्रवास करू शकता. याशिवाय तीन दिवसांचा पास 700 रुपयांमध्ये सलग तीन दिवस तुम्हाला हवा तितका प्रवास करण्याची मुभा देईल.

    Maharashtra TimesNashik BJP Protest : नाशिकमधील IT कंपनीत बळजबरी धर्मांतर अन् अत्याचार प्रकरण, कंपनीविरोधात भाजप आक्रमक; कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन

    सामान्य प्रवाशांचीही बचत

    केवळ विद्यार्थी किंवा पर्यटकच नाही, तर दररोज ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांसाठीही मेट्रोने सवलती जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही 45 फेऱ्यांचा पास काढला तर 10 टक्के आणि 60 फेऱ्यांच्या पासवर 15 टक्के सूट मिळेल. विशेष म्हणजे, दिव्यांग प्रवाशांना सुरुवातीपासूनच २५ टक्के सवलत दिली जात आहे, ती कायम असणार आहे.

    फायदा कसा मिळवायचा?

    हे सर्व फायदे मिळवण्यासाठी प्रवाशांनी ‘मेट्रो कनेक्ट 3’ (Metro Connect 3) हे अधिकृत अ‍ॅप डाऊनलोड करणे किंवा एनसीएमसी (NCMC) कार्ड वापरणे आवश्यक आहे. आरे ते कफ परेड हे 33.5 किमीचे अंतर आता कमी खर्चात आणि वेगवान पद्धतीने पार करणे मुंबईकरांना शक्य झाले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा