• Sun. Jun 14th, 2026
    Kalyan Crime : निवृत्त DCPची दादागिरी; महिलांशी गैरवर्तन, सोसायटी पदाधिकाऱ्यांना मारहाण, कल्याणमधील प्रकार सीसीटीव्हीत कैद

    Kalyan News: कल्याण पश्चिमेतील वल्लभ टॉवर या हायप्रोफाईल सोसायटीत निवृत्त पोलीस उपायुक्त बी. एल. पवार यांनी दारूच्या नशेत धुमाकूळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्यावर महिलेचा विनयभंग, चारित्र्यहनन आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    निवृत्त DCPची दादागिरी; महिलांशी गैरवर्तन, सोसायटी पदाधिकाऱ्यांना मारहाण, कल्याणमधील प्रकार सीसीटीव्हीत कैद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रदिप भणगे, ठाणे : कल्याण पश्चिमेतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका निवृत्त पोलीस उपायुक्ताने (DCP) दारूच्या नशेत धुमाकूळ घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या निवृत्त अधिकाऱ्याने महिलांशी अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला असून, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाही बेदम मारहाण केली आहे. ही सर्व धक्कादायक घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून, कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास वल्लभ टॉवर (पौर्णिमा टॉकीज जवळ) येथे ही घटना घडली. सोसायटीत राहणारी एक महिला आपल्या लहान मुलासह दुचाकीवरून बाहेर जाण्यासाठी पार्किंगमध्ये आली होती. यावेळी तिथेच राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी बी. एल. पवार यांनी मुद्दाम आपली चारचाकी त्या महिलेच्या दुचाकीमागे उभी केली. महिलेने वारंवार हॉर्न वाजवून गाडी बाजूला घेण्याची विनंती केली, मात्र पवार यांनी गाडी हटवली नाही. उलट, त्या महिलेकडे अश्लील नजरेने पाहत तिचे चारित्र्यहनन करणारे शब्द वापरले आणि तिच्या पायाला गाडीचा धक्का लावून शिवीगाळ सुरू केली.

    सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण

    या वादाचा आवाज ऐकून सोसायटीचे रहिवासी आणि पदाधिकारी घटनास्थळी जमा झाले. जेव्हा त्यांनी निवृत्त अधिकाऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी अधिकच आक्रमक होत सर्वांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी सोसायटीच्या सेक्रेटरीचे कान पकडून त्यांना मारहाण केली, तर चेअरमनना धक्काबुक्की केली. उपस्थित महिलांनी विरोध केला असता, आरोपीने त्यांच्याशीही असभ्य चाळे करत विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime : जातीवरुन छळ, मानसिक त्रास; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, एसटी महामंडळात खळबळ

    सीसीटीव्ही फुटेजमुळे गुंता वाढला

    निवृत्त अधिकाऱ्याच्या या ‘दबंगगिरी’चे सर्व फुटेज सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. यामध्ये ते रहिवाशांना मारहाण करताना आणि महिलांशी गैरवर्तन करताना स्पष्टपणे दिसत आहेत. घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले. एका माजी उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यानेच अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

    पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग, मारहाण आणि शिवीगाळीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एका निवृत्त जबाबदार अधिकाऱ्याचे हे वागणं सध्या कल्याणात चर्चेचा विषय ठरले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा