Jalna Ambad Son Father Killed : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्या, जालन्यात एक मोठी घटना समोर आली आहे. पोटच्या १९ वर्षीय मुलाने आपल्याच वडिलांची हत्या केली आहे.
पहाटेच्या सुमारास वडिलांचं पार्थिव आढळलं
मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील रुई गावात सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू (वय ४५) यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलं. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ तीर्थपुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासात दिलीप राजगुरू यांच्या डोक्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीचे गंभीर घाव असल्याचं आढळून आलं, त्यामुळे ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं.
Crime News: पेट्रोल पंपावर भरदिवसा क्रूरतेचा कळस; तरुणाने सपासप वार करून पूजाला संपवलं, एकतर्फी प्रेमाची किनार असल्याचा अंदाज
वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचा मुलाला राग
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. दिलीप राजगुरू यांचा स्वतःचा मुलगा विलास राजगुरू (वय १९) यानेच आपल्या एका साथीदाराच्या मदतीने ही हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी संशयाच्या आधारे विलासला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या हत्येमागील कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. विलासच्या आईचं म्हणजेच दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर ते एकटेच राहत होते. दरम्यान, त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि विशेष म्हणजे, त्यांच्या विवाहाचा दिवस हा घटनेच्याच दिवशी ठरलेला होता. मात्र, वडिलांच्या या निर्णयाबद्दल मुलगा विलास नाराज होता. वडील दुसरं लग्न करत असल्याचा राग त्याच्या मनात खोलवर घर करून बसला होता.
Pune Crime : एकट्यात गाठून आधी बेदम मारहाण, नंतर बेछूट गोळीबार; पुण्यात जुन्या वादातून मोठी घटना
मित्रासोबत रचला हत्येचा कट
विलासने रागातून आपल्या एका मित्राच्या मदतीने वडिलांच्या हत्येचा कट रचला. सकाळच्या सुमारास संधी साधून विलासने कुऱ्हाडीने वडिलांवर सपासप वार केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ज्या दिवशी दिलीप राजगुरू यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती, त्याच दिवशी त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे रुई गावासह संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे. नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो, याचं हे भीषण उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, तीर्थपुरी पोलीस ठाण्यात आरोपी मुलगा विलास राजगुरू आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशावरून तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार या करीत आहे.
