• Thu. Sep 17th, 2026
मुंबईत उन्हाचा चटका वाढला, वाढत्या तापमानासह हवेची गुणवत्ता सुधारली; प्रदूषकांच्या पातळीत 14-17 टक्के घट

Mumbai AQI 9 April: मुंबई शहरासह उपनगरात दिवसभर निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी शहरातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यात पाऊस गेले काही दिवस थांबला असून पुन्हा उन्हाचा चटका वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे 9 एप्रिल रोजी मुंबई, ठाणे शहरांत दिवभर अंशतः ढगाळ वातावरणासह उन्हाच्या झळा बसण्याच्या शक्यता आहेत. दरम्यान, गेल्या तीन वर्षांच्या तुलनेमध्ये जानेवारी २०२६ ते मार्च २०२६ या कालावधीतील मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यंदा जानेवारी ते मार्च या कालावधीत ‘पीएम २.५’ या प्रदूषकाच्या पातळीत सरासरी १४ टक्के, तर ‘पीएम १०’च्या पातळीत १७ टक्के घट नोंदली गेली आहे. यामध्ये प्रामुख्याने वाऱ्यांच्या दिशेचा प्रभाव असल्याचे दिसते. तसेच प्रदूषण घटवण्यासाठीच्या उपाययोजनांचाही हातभार लागल्याचे दिसते.

अहवालात आकडेवारी समोर

‘रेस्पायरर लिव्हिंग सायन्सेस’ने केलेल्या ‘अॅटलास एक्यू’च्या आकडेवारीच्या विश्लेषणाद्वारे हे समोर आले आहे. ‘रेस्पायरर लिव्हिंग सायन्सेस’च्या माध्यमातून सन २०२४, २०२५ आणि २०२६ या तीनही वर्षांच्या प्रदूषण निर्देशांकाचा अभ्यास करण्यात आला. सन २०२५मध्ये प्रदूषकांचे प्रमाण सन २०२४च्या तुलनेत वाढल्याचे दिसले. मात्र सन २०२६मध्ये ही प्रदूषके कमी झाल्याचे समोर आले. ‘पीएम २.५’च्या पातळीत सन २०२५च्या तुलनेत सन २०२६च्या जानेवारीमध्ये १५.४ टक्के, फेब्रुवारीत ५.२ टक्के आणि मार्चमध्ये २१.६ टक्के घट नोंदवण्यात आली. ‘पीएम १०’मध्ये जानेवारीत १७.९ टक्के, फेब्रुवारीत १२ टक्के आणि मार्चमध्ये २०.७टक्के घट झाली.Maharashtra TimesMumbai Metro 9: पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’! दहिसर-काशीगाव मेट्रोला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, स्थानकांवर गर्दी; बाहेर पडण्यासाठी रांगा

शहराच्या आकडेवारीची सरासरी पाहता, दैनंदिन स्तरावर ‘पीएम २.५’ प्रदूषके ‘समाधानकारक’ आणि ‘पीएम १०’ प्रदूषके ‘मध्यम’ श्रेणीत होती. या तीन महिन्यांमध्ये शहराची सरासरी ‘वाईट’, ‘अतिवाईट’ किंवा ‘गंभीर’ स्वरूपाची नोंदली गेली नाही. काही केंद्रांवर तुरळक दिवस हवेची स्थिती ‘वाईट’ नोंदली गेली. या तीन वर्षांमध्ये मार्च २०२६मध्ये ‘पीएम २.५’ ची पातळी १५ दिवस चांगल्या श्रेणीत होती. हा काळ या तीन वर्षांमधील सर्वांत कमी प्रदूषकांचा नोंदला गेला आहे. प्रदूषणाची पातळी सातत्याने सकाळी ८ ते ११ या वेळेत सर्वाधिक दिसली. सकाळचा वाहतूक ताण आणि इतर मानवी हालचाली यांसाठी कारणीभूत आहेत.

Maharashtra TimesMumbai Local: लोकलने चुकवला थांबा! भाईंदर स्थानक सोडून दोन किलोमीटर पुढे थांबली ट्रेन; प्रवाशांवर रुळांवर उड्या मारण्याची वेळ

पावसामुळे हवेत सुधारणा

‘दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत प्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. याचा अर्थ, वाहतूक आणि बांधकामांसंबंधी हालचालींवर विशेष लक्ष केंद्रीत करून या तासांत त्यावर नियंत्रणासाठी हस्तक्षेप केल्यास, रहिवाशांच्या दैनंदिन आयुष्यात फरक पडू शकतो,’ असे मत ‘रेस्पायरर लिव्हिंग सायन्सेस’चे संस्थापक रोनक सुतारिया यांनी व्यक्त केले. जानेवारी २०२६च्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे सूक्ष्म कण निघून जाण्यास हातभार लागला. मार्चकडे हंगाम सरकत गेला, तसतसे तापमानवाढीमुळे प्रदूषके वाहून नेण्यास चालना मिळाली.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा