• Fri. Jul 3rd, 2026

    PMP बस कंडक्टरने शक्कल लावून तरुणीला शोधलं, प्रामाणिकपणाचं कौतुक

    PMP बस कंडक्टरने शक्कल लावून तरुणीला शोधलं, प्रामाणिकपणाचं कौतुक

     पुणे 

    रोजच्या गर्दीत हरवूनही जिवंत असलेल्या माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना पुण्यात घडली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वाहकाने सव्वादोन तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पर्स परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श समोर ठेवला. संबंधित महिलेने दागिने परत मिळाल्यानंतर वाहकाचे आभार मानले.

    नेमकं काय घडलं?

    भेकराईनगर आगारातील वाहक अभिमन्यू खंदारे तीन एप्रिलला आगारातून नेहमीप्रमाणे बस घेऊन निघाले. भेकराईनगरहून पहाटे चार वाजून ४० मिनिटांनी बस वाघोलीकडे निघाली. हडपसरमध्ये एक तरुणी आणि तिचे आई-वडील बसमध्ये बसले. बस वाघोलीला पोहोचल्यानंतर सर्व प्रवासी उतरले. खंदारे यांना तपासणीत एक पर्स खाली पडलेली दिसली. ती उघडून पाहिल्यावर त्यात सुमारे सव्वादोन तोळे सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ चालक संकेत गारुळे यांना प्रवाशाची पर्स विसरल्याचे सांगितले.

    तरुणीच्या डोळ्यात आनंदाश्रू

    या गाडीतून उतरलेले प्रवासी वाघोलीहून रांजणगावकडे जाणाऱ्या बसमध्ये बसतात. या बसमधील प्रवासी तिकडे गेले होते. खंदारे यांंनी रांजणगाव बसमध्ये प्रवाशांना भेकराईनगरहून आलेल्या कोणाची पर्स विसरली आहे, का अशी विचारणा केली. त्या वेळी तरुणीला तिची पर्स नसल्याचे लक्षात आले. पर्स पाहिल्यानंतर ती आपलीच असल्याची तिची खात्री पटली. वाघोली डेपोतील अधिकाऱ्यांसमोर साहित्याची शहानिशा करून पर्स परत मिळाल्यावर त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.

    Kolhapur | कोल्हापुरात माहीची परंपरा, मटणाच्या वाट्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

    प्रामाणिकपणाचं कौतुक

    त्यांनीदेखील ‘आजच्या काळात अशी माणसे अजून आहेत, यावर विश्वास बसत नाही,’ असे म्हणून खंदारे यांचे आभार मानले. खंदारे यांचा हा प्रामाणिकपणा कौतुकाचा विषय ठरला.

    वाहक काय म्हणाला?

    पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर बसमध्ये पर्स विसरल्याचे आढळले. ती पर्स रांजणगावला जाणाऱ्या बसमधील प्रवाशाची असण्याची शक्यता होती. ती बस गेली तर प्रवाशाला शोधणे कठीण जाईल, असे वाटून आम्ही तत्काळ शोध घेतला. त्या महिलेला तिची पर्स मौल्यवान ऐवजासह परत मिळाली याचा आनंद आहे, असं वाहक अभिमन्यू खंदारे म्हणाले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed