• Sat. Sep 5th, 2026

रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयांच्या विकासाला गती – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 3, 2026
रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयांच्या विकासाला गती – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

मुंबई, दि. ३ : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मौजे वावे, चिपळूण तालुक्यातील मौजे रामपूर तसेच गुहागर तालुक्यातील गुहागर व आबलोली येथील शासकीय आरोग्य संस्थांच्या विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत, तसेच बांधकाम, श्रेणीवर्धन, पदनिर्मिती, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

विधान भवन येथे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांच्या प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार भास्कर जाधव, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ. सुनीता गोलाईत, सहसंचालक राजेंद्र भालेराव तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरीचे जिल्हा शल्यचिकित्सक आणि कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक सहभागी झाले होते.

बैठकीत खेड तालुक्यातील मौजे वावे येथील शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक अंदाजपत्रक, निधी मंजुरी, वैद्यकीय उपकरणे, उपलब्ध जागा आणि इतर पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या कामासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

चिपळूण तालुक्यातील मौजे रामपूर येथील श्रेणीवर्धित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी किमान ६१ गुंठे जागेची आवश्यकता असून सध्या केवळ ३३ गुंठे जागा उपलब्ध आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची ४० गुंठे जागा उपलब्ध करून नवीन इमारत उभारण्याबाबत ग्रामपंचायतीची मदत घ्यावी असे त्यांनी सांगितले.

गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्रात जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारतीचा प्रस्ताव  सादर करावा. तसेच आरोग्य सेवा संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी व रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा विचार करून आवश्यक कामांसाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले.

आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, कोकणातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून रत्नागिरी जिल्ह्यातील आवश्यक आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सर्व संबंधित प्रस्तावांना प्राधान्याने गती दिली जाईल.

००००

एकनाथ पोवार/स.सं

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed