• Sun. Jun 14th, 2026

    Election News: देशातील चार राज्यांमध्ये निवडणुका, पण हवामानातील टोकाची स्थिती गंभीर धोका; मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम?

    Election News: देशातील चार राज्यांमध्ये निवडणुका, पण हवामानातील टोकाची स्थिती गंभीर धोका; मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम?

    Heat Wave: उष्णतेमुळे मतदार घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी होणे, मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना त्रास होणे, हवामानाची तीव्रता वाढल्यास निवडणूक प्रक्रियेवर परिणाम अशा विविध शक्यता संभवतात.

    देशातील चार राज्यांमध्ये निवडणुका, पण हवामानातील वाढती टोकाची परिस्थिती गंभीर धोका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: एप्रिल महिन्यात पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू आणि केरळ या चार भारतीय राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असताना, हवामानातील वाढती टोकाची परिस्थिती ही निवडणुकीच्या तयारीसाठी गंभीर धोका म्हणून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी वर्तवलेले हवामानाचे इशारे लक्षात घेऊन निवडणुकीच्या दिवसासाठी तयारी व्हायला हवी, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

    या चारही राज्यांमध्ये २.१९ लाख मतदान केंद्रे असून १७.४ कोटी मतदार मतदान करणार आहेत. या राज्यांमधील एप्रिलमधील गेल्या पाच वर्षांची हवामानाची आकडेवारी आणि भारतीय हवामान विभागाने यंदा एप्रिलसाठी दिलेला अंदाज पाहता वाढती उष्णता, आर्द्रता, मेघगर्जना, विजा हे घटक निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, याकडे ‘क्लायमेट ट्रेंड्स’ या मंचामार्फत लक्ष वेधण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता एप्रिल महिना अधिक उष्ण झाल्याचे दिसत आहे. तसेच आर्द्रतेचे प्रमाणही अधिक आहे. एप्रिल २०२२ मध्ये सरासरीपेक्षा १.३६ अंश सेल्सिअसने तापमान अधिक होते. उष्णतेसोबतच वातावरणही बेभरंवशाचे झाले आहे, असेही समोर येते. गेल्या काही काळात पावसाची तीव्र तूट किंवा अतिरिक्त पावसाचीही नोंद झाली आहे. हे वातावरण मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम करणारे ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    आसाममध्ये निवडणुकीच्या आधीच्या काळात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मेघगर्जनाही होऊ शकते. पश्चिम बंगालमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. येथे मेघगर्जनेसह पाऊस तसेच विजांचीही शक्यता आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये अधिक प्रमाणात उष्णता आणि आर्द्रता जाणवू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक तापमान जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे अधिक अस्वस्थता जाणवू शकते. पूर्व किनारपट्टीवर एप्रिलमध्ये सरासरीहून अधिक उष्णतेच्या लाटा निर्माण होऊ शकतात, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पूर्व किनारपट्टीवर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राज्यांचा समावेश आहे. ही वातावरणीय स्थिती निवडणुकीवर विविधांगी परिणाम करू शकते, असे ‘स्कायमेट वेदर’चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले.

    उष्णता, वादळाविषयी पूर्वतयारी आवश्यक
    एप्रिलमधील वातावरण हे तीव्र होत असल्याने निवडणुकीची तयारी करताना त्यासाठी सज्जता गरजेची आहे. यात उष्णतेशी सामना करण्याची तयारी, वादळासाठीची पूर्वतयारी, सुरक्षेच्या उपाययोजना यांचा विचार आवश्यक असल्याचे या विश्लेषणात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी निवडणूक आयोगाची तयारी असल्याचे अधिकाऱ्यांतर्फे सांगितले जात आहे. त्याच वेळी निवडणुकांमुळे वातावरण बदलाला कसा हातभार लागत आहे, याचाही विचार झाला पाहिजे, असे आवाहन माजी मुख्य निवडणूक अधिकारी ओ. पी. रावत यांनी केले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा