• Tue. Jun 16th, 2026

    Pune Crime: प्रेमासाठी महिला इंदोरहून पुण्यात आली, हॉटेलमध्ये राहिली, मात्र नंतर वेगळाच अनुभव; तरुणावर गुन्हा दाखल

    Pune Crime: प्रेमासाठी महिला इंदोरहून पुण्यात आली, हॉटेलमध्ये राहिली, मात्र नंतर वेगळाच अनुभव; तरुणावर गुन्हा दाखल

    Pune News: आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ही महिला थेट इंदोरहून पुण्यात आली. पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर महिला पुन्हा इंदोरला गेली.

    प्रेमासाठी महिला इंदोरहून पुण्यात आली, हॉटेलमध्ये राहिली, मात्र नंतर वेगळाच अनुभव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : ऑनलाईन मॅट्रिमोनियल साइटवर निर्माण झालेली ओळख किती धोकादायक वळण घेऊ शकते, याचे उदाहरण पुण्यात समोर आले आहे. मॅट्रिमोनियल साइटवर झालेल्या ओळखीनंतर एका व्यक्तीच्या प्रेमात पडून इंदोरहून पुण्यात आलेल्या ४२ वर्षीय पीडितेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपी प्रशांत प्रकाश चव्हाण (वय ४२, रा. फुरसुंगी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध वेगाने सुरू आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची ओळख मॅट्रिमोनियल साइटवरून आरोपीसोबत झाली होती. सुरुवातीला गोड बोलणे, काळजी घेत असल्याचे दाखवणे आणि भविष्याबाबत मोठमोठी स्वप्नं दाखवत आरोपीने महिलेचा पूर्ण विश्वास संपादन केला. “आपण लग्न करू” असे ठाम आश्वासन देत त्याने तिला पुण्यात येण्यास प्रवृत्त केले.

    नोकरीचे आश्वासन दिले मात्र, नंतर दिला लग्नाला नकार…

    आरोपीने सदर महिलेला नोकरीचे आश्वासन दिले आणि पीडित महिला इंदोरचा जॉब सोडून पुण्यात आली. पुण्यात आल्यानंतर चव्हाण याने तिला स्वतःच्या हॉटेलमध्ये कामाला लावले. त्याच हॉटेलमध्ये तिची राहण्याची सोय केली. चार ते पाच महिने पीडित महिला त्याठिकाणी राहिली. त्यावेळी अनेकदा तिच्या इच्छेविरुद्ध आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर मानसिक दबाव टाकला आणि तिचा गैरफायदा घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

    हॉटेलमध्ये काम करत असताना पगाराच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाले. तरीही आरोपी वेळोवेळी “लग्न करू” असे सांगत तिला आश्वासने देत राहिला. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने अचानक लग्नास नकार दिला आणि महिलेपासून दूर राहू लागला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. मानसिक धक्का बसलेल्या महिलेने अखेर हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून लवकरच आरोपीला अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    दरम्यान, या प्रकरणामुळे ऑनलाईन मॅट्रिमोनियल साइट्सवरील फसवणुकीचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा समोर आले आहे. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये, कोणतीही वैयक्तिक माहिती देताना सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा