• Sun. Jun 14th, 2026
    दहावीच्या विद्यार्थ्यावर अत्याचार, महाडमध्ये खाजगी क्लासच्या शिक्षकावर गुन्हा, पीडित मुलगा मानसिक तणावात

    Raigad Class Teacher Student Assault : शिक्षकाने शिकवणीच्या निमित्ताने विद्यार्थ्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रायगड : जिल्ह्यातील महाड येथे गुरु-शिष्य नात्याला काळिमा फासणारी गंभीर घटना उघडकीस आली आहे. खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाविरोधात अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    काय आहे प्रकरण?

    पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात घडली आहे. पीडित मुलगा इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. पीडित विद्यार्थी हा येथील नामांकित असलेल्या गांधी क्लासमध्ये शिकवणीसाठी जात होता. संबंधित शिक्षकाने शिकवणीच्या निमित्ताने विद्यार्थ्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

    आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा

    या प्रकारामुळे पीडित विद्यार्थी मानसिक तणावाखाली गेला होता. अखेर त्याने धाडस दाखवत पालकांना माहिती दिली आणि त्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित शिक्षकाविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

    दरम्यान, या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात संताप व्यक्त केला जात असून, शिक्षकांसारख्या जबाबदार व्यक्तीकडून अशा प्रकारचे कृत्य होणे अत्यंत गंभीर मानले जात आहे. स्थानिक नागरिक तसेच पालकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शिकवणी वर्गांवर अधिक कडक देखरेख ठेवण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.

    पोलिसांकडून या प्रकरणात आणखी काही विद्यार्थी पीडित आहेत का, याचा तपासही केला जात असून, आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांशी सतत संवाद ठेवावा, त्यांच्या वागण्यात होणारे बदल लक्षात घ्यावेत आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा