• Sat. Jun 6th, 2026

    Bullet Train: बुलेट ट्रेनच्या बोगद्याचं 5 किमी खोदकाम पूर्ण, घणसोली-शिळफाटा मार्ग तयार; मुंबईत भूमिगत स्थानक पूर्णत्वाकडे

    Bullet Train: बुलेट ट्रेनच्या बोगद्याचं 5 किमी खोदकाम पूर्ण, घणसोली-शिळफाटा मार्ग तयार; मुंबईत भूमिगत स्थानक पूर्णत्वाकडे

    Mumbai-Ahmedabad Bullet Train: राज्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 21 किमी लांब बोगदा तयार करण्यात येणार आहे. त्याचं खोदकाम सुरू असून 5 किमी मार्ग तयार झाला आहे. राज्यात 3 उन्नत आणि एक भूमिगत स्थानक असेल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महामुंबईमध्ये सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाने निर्णायक टप्पा पार केला आहे. २१ किलोमीटर लांबीच्या अत्यंत महत्त्वाच्या बोगद्यापैकी ५ किलोमीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’ (एनएटीएम) तंत्रज्ञानाने खोदकाम पूर्ण झाले असून आता आतील भागाच्या मजबूतीकरणाच्या कामाला आरंभ झाला आहे. उर्वरित बोगदा ‘टनेल बोरिंग मशिन’च्या (टीबीएम) मदतीने बांधण्यात येणार आहे.

    प्रकल्पाचं काम वेगाने सुरू

    बुलेट ट्रेन प्रकल्प भुयारी आणि उन्नत पद्धतीने तयार होत आहे. मुंबईत जागेची अडचण असल्याने वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटादरम्यान २१ किमी लांबीच्या बोगद्याची खाडी आणि पारसिक डोंगराखालून निर्मिती होत आहे. यात घणसोली ते शिळफाटा हा ५ किमीचा टप्पा आहे. गुजरातमध्ये उन्नत बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.Maharashtra TimesMumbai Local: रविवारी सकाळी मुंबईकरांचा खोळंबा! एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; प्रवासी स्थानकांवर ताटकळत

    ‘एनएटीएम’ पद्धतीने पाच किमी बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. आता बोगद्याच्या सुरक्षितता, जलरोधकता आणि दीर्घकालीन टिकाऊपणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या बोगद्याच्या आत ड्रेनेज सिस्टीम उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्याच्या भिंतींमधून तसेच छतामधून झिरपणारे पाणी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष ‘ड्रेनेज कास्टिंग गॅन्ट्री’चा वापर केला जात आहे. या यंत्रणेमुळे झिरपणारे पाणी स्वतंत्रपणे निचरा मार्गाने बाहेर सोडले जाते. झिरपणाऱ्या पाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असल्याने भविष्यातील संरचनात्मक धोक्यांना आळा घालणे शक्य झाले आहे. बोगद्याच्या आतील भागाला जलरोधक संरक्षण देण्यासाठी ‘वॉटरप्रूफिंग’ करण्यात येत आहे. यामुळे भूजल किंवा पावसाळ्यातील पाणी बोगद्यात शिरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

    बोगद्याला बळकट करण्यासाठी काम

    बोगद्याला कायमस्वरूपी मजबुतीसाठी स्टीलच्या सळ्यांचे जाळे अर्थात ‘रिइनफोर्समेंट केजेस’ बसवण्याचे काम आता सुरू झाले आहे. स्टील जाळ्यांमुळे काँक्रीटच्या बांधकामाला मजबूत आधार मिळणार आहे. परिणामी बोगद्याच्या भिंती आणि छताला अधिक बळकटी मिळणार आहे. यानंतर अंतिम काँक्रीटचा थर ‘लायनिंग गॅन्ट्री’च्या मदतीने टाकण्यात येईल. हा बोगद्याच्या कामाचा शेवटचा टप्पा असणार आहे. या प्रक्रियेमुळे बोगद्याला गुळगुळीत फिनिशिंगसह दीर्घकालीन स्थिरता मिळणार आहे, असे या प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

    Maharashtra TimesPanchvati Express: ट्रेनचा डबा मागेच राहिला! एक डबा वगळून पंचवटी एक्स्प्रेस रवाना; सीएसएमटी स्थानकावर तांत्रिक बिघाड

    बोगद्यात बुलेट ट्रेन वाहतुकीसह देखभालीसाठी आवश्यक यंत्रणेसाठी विशेष उपकरण कक्षाची निर्मिती करण्यात येत आहे. या कक्षातून बोगद्याचे निरीक्षण, वायुवीजन यंत्रणा, विद्युत प्रणाली आणि आपत्कालीन यंत्रणा यांवर देखरेख ठेवण्याचे काम होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा