अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सीडीआर लीक, निवडक माहिती समोर येणे आणि सीबीआय चौकशीची मागणी यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले असून, या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्नेहल निमगिरे, पुणे : अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “गृहमंत्र्यांना हे प्रकरण मॅनेज करायचं आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. अंधारे म्हणाल्या की, या प्रकरणात काही निवडक नेत्यांचीच नावे पुढे येत असून, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांची नावे ‘अँटी-सीएम’ यादीतून समोर येत आहेत. “ज्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संबंध नाही, त्यांच्याच सीडीआर समोर येत आहेत. मात्र जयकुमार रावल किंवा गिरीश महाजन यांची माहिती का समोर येत नाही?” असा सवाल त्यांनी केला.
“सीडीआर बाहेर कसे आले?”
सीडीआर (Call Detail Records) लीक होण्याच्या मुद्द्यावर अंधारेंनी गंभीर शंका व्यक्त केली. “हे सीडीआर बाहेर कसे आले? ज्याला दमानिया ओळखत नाही, तो व्यक्ती दमानियाला कसा ओळखतो? त्याला ताब्यात घेऊन चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “एसआयटीवर आतापर्यंत विश्वास होता, पण आता संशय निर्माण झाला आहे. तपासात फक्त निवडक माहितीच बाहेर आणली जात आहे का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.या प्रकरणाची व्याप्ती केवळ लैंगिक शोषणापुरती मर्यादित नसून, मोठ्या आर्थिक व्यवहारांशीही संबंधित असल्याचा आरोप अंधारेंनी केला. “अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी झाली आहे. सृष्टी खरात आणि संबंधितांच्या नावावर किती मालमत्ता आहे, हे समोर आले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्यावरही अंधारेंनी टीका केली. “पुरावे असल्याशिवाय मी बोलत नाही, पण त्यांना विज्ञानवादी समजण्याचे कारण नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सीबीआय चौकशीची मागणी
अंधारेंनी शेवटी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी सीबीआय चौकशीची मागणी केली. “या सगळ्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर शंका घेण्यास भाग पाडले जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. या सर्व आरोपांमुळे अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले असून, पुढील काळात तपासाची दिशा काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा