• Mon. Jun 15th, 2026

    Kalpana Kharat : शिर्डीतील शेतकऱ्याची जमीन बळकावली, अटकेच्या भीतीने भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी फरार

    Kalpana Kharat : शिर्डीतील शेतकऱ्याची जमीन बळकावली, अटकेच्या भीतीने भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी फरार

    शिर्डीत भोंदू बाबा अशोक खरातने शेतकऱ्याची कोट्यवधींची जमीन बेकायदेशीर सावकारकीतून हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

    जमीन हडपल्याप्रकरणी अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, शिर्डी : शिर्डी परिसरात एका शेतकऱ्याची कोट्यवधींची जमीन फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीच्या माध्यमातून बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणात भोंदू बाबा मुख्य आरोपी अशोक खरात याच्यासह त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने संपूर्ण शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, आरोपींनी रावसाहेब गोंदकर या सामान्य शेतकऱ्याला सावकारकीच्या जाळ्यात अडकवत त्याची जमीन हडप केल्याचा आरोप आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याचा गैरफायदा घेत योजनाबद्ध पद्धतीने ही फसवणूक करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

    दोघांना अटक

    दरम्यान, या प्रकरणात आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना शिर्डी पोलिसांनी अटक केली असून अशोक तांबे या आरोपीचा शोध सुरू आहे. अटकेत असलेल्या दोघांना मंगळवारी राहाता न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडीत पोलिसांकडून अधिक चौकशी करून प्रकरणातील इतर धागेदोरे उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.मुख्य आरोपी अशोक खरात हा आधीपासूनच दुसऱ्या गुन्ह्यात नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर त्यालाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्याची पत्नी कल्पना खरात हिलाही अटक करण्यासाठी तपास यंत्रणांनी नाशिक येथील तृप्तबाला बंगल्यावर धडक दिली, पण खरातची पत्नी तिथून फरार झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी सध्या खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

    Maharashtra TimesAshok Kharat Case : खरात कुटुंबावर SITचा फास; तृप्तबाला बंगल्यातून मुलगा ताब्यात, पत्नी कल्पना खरात फरार

    सखोल तपास सुरु

    अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “फसवणूक आणि सावकारकी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सखोलपणे सुरू आहे. संबंधित सर्व आरोपींवर कडक कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

    दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे शिर्डी परिसरात बेकायदेशीर सावकारकी आणि जमीन व्यवहारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. आता भोंदू बाबा अशोक खरातच्या फरार पत्नीला कधी अटक होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा