• Sun. Jun 7th, 2026

    राज्य प्रशासनात मोठे फेरबदल; तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, धडाकेबाज अधिकाऱ्याकडे नवी जबाबदारी

    राज्य प्रशासनात मोठे फेरबदल; तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, धडाकेबाज अधिकाऱ्याकडे नवी जबाबदारी

    IAS Transfers: राज्याच्या प्रशासनात बरेच फेरबदल झाले आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. धडाकेबाज निर्णयांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठे प्रशासकीय बदल केले आहेत. अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांची जागा अश्विनी भिडे घेतील.

    अश्विनी भिडे यांच्या रुपात मुंबई महापालिकेला पहिली आयुक्त मिळाली आहे. त्यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची जबाबदारीदेखील कायम राहणार आहे. मेट्रो रेलचं प्रमुखपद त्यांच्याकडे असेल. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी लागली आहे. ते मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहतील. सध्याच्या घडीला अतिरिक्त मुख्य सचिव असलेले विकास रस्तोगी यांच्याकडे आता वित्तीय बदलांची जबाबदारी असेल. अर्थ मंत्रालयात त्यांची वर्णी लागली आहे. याआधी ते कृषी मंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते.

    परिमल सिंह यांच्याकडे कृषी खात्याच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी होती. विनिता वैद सिंघल यांच्याकडे जल आणि मृदा संवर्धन विभागाचं प्रमुख सचिवपद देण्यात आलं आहे. याआधी त्या आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभागांचा कारभार पाहत होत्या.

    पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेल्या बी. पी.पृथ्वीराज यांच्याकडे वसई विरार महापालिकेचं आयुक्त पद देण्यात आलं आहे. तर कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची मंत्रालयाच्या मदत आणि पुनर्वसन विभागात बदली झाली आहे. सध्या ते दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या जागी आता माणिक गुर्सल यांची वर्णी लागली आहे.

    शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची जबाबदारी लहू माळी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पाचं काम आधी कुणाल कुमार यांच्याकडे होतं. पण त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. प्रेरणा देशब्रतार यांची मत्स्य विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा