गॅस टंचाईमुळे इंधन संकट ओढावले असून नागरिक पुन्हा चुलीकडे वळले आहेत. यामुळे वृक्षतोड वाढली असून पर्यावरण आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गॅसअभावी नागरिक पुन्हा चुलीकडे वळले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रायगड, अमुलकुमार जैन : रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईचे संकट अधिकच गडद होताना दिसत आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघर अक्षरशः विस्कळीत झाले आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून धूरमुक्त घराचे स्वप्न पाहणाऱ्या गृहिणींना आता नाइलाजास्तव पुन्हा पारंपरिक चुलीकडे वळावे लागत आहे. मात्र, या इंधन टंचाईचा थेट फटका आता जिल्ह्याच्या पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर बसू लागला असून, रायगडमध्ये एक नवा सामाजिक प्रश्न उभा ठाकला आहे.
जंगलांवर वाढला ताण
घरगुती गॅसची उपलब्धता घटल्याने जळाऊ लाकडाची मागणी प्रचंड वाढली आहे. गॅसअभावी चूल पेटवण्यासाठी लाकूड गोळा करण्याकरिता महिला, पुरुष, वृद्ध आणि अगदी लहान मुलेही कडाक्याच्या उन्हात रानावनात वणवण करताना दिसत आहेत. ग्रामीण भागातच नव्हे, तर निमशहरी भागातही हीच परिस्थिती आहे. परिणामी, वनसंपदेवर अघोषित कुऱ्हाड चालवली जात असून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर जिल्ह्याचे हरित कवच धोक्यात येण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
आर्थिक बजेट कोलमडले
इंधन टंचाईमुळे केवळ गृहिणीच नव्हे, तर हॉटेल व्यावसायिकही मेटाकुटीला आले आहेत. गॅसअभावी अनेक हॉटेल्समध्ये आता चुलीवर स्वयंपाक केला जात आहे, ज्यामुळे श्रम आणि वेळ दोन्ही वाढले आहेत. त्यातच जळाऊ लाकडाचे दरही गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. “गॅस महाग झाला तरी परवडले असते, पण इथे गॅस मिळतच नाहीये आणि लाकूडही महाग झाले आहे, आता करायचे काय?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
चुलीच्या धुरामुळे श्वसनाचे विकार डोकं वर काढू लागले आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चुलीसमोर तासनतास बसून स्वयंपाक करणाऱ्या महिलांना डोळ्यांचे विकार, दम लागणे आणि फुफ्फुसांचे गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कडाक्याचे ऊन आणि त्यात चुलीची धग यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुहेरी आघात होत आहे.
पर्यावरणाची धोक्याची घंटा
वाढती जंगलतोड ही भविष्यातील मोठ्या संकटाची नांदी आहे. जैवविविधतेचा ऱ्हास, वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे आक्रमण आणि वाढते तापमान यामुळे रायगडमधील निसर्गचक्र धोक्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी पावले उचलली नाहीत, तर हा प्रश्न केवळ इंधन टंचाईपुरता मर्यादित न राहता एक पर्यावरणीय आपत्ती म्हणून समोर येईल. आता जिल्हा प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा