• Tue. Sep 22nd, 2026

आरोग्य व्यवस्थेत नैतिकतेचा पाया भक्कम करणे ही काळाची गरज – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 29, 2026
आरोग्य व्यवस्थेत नैतिकतेचा पाया भक्कम करणे ही काळाची गरज – महासंवाद

मुंबई, दि. २९ :आरोग्य व्यवस्थेत नैतिक मूल्यांची जपणूक ही काळाची गरज असल्याचा संदेश ‘मेडिकल इथीक्स इन इंडिया’ या विषयावरील चर्चासत्रातून देण्यात आला. रुग्णांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि उपचार प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी डॉक्टरांनी नैतिकतेला प्राधान्य द्यावे, असे मत तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केले.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथील ‘पल्स वैद्यकीय परिषद २०२६’ परिषदेत आयोजित केलेल्या या चर्चासत्रात ॲडव्होकेट आणि मेडिकोलीगल एक्सपर्ट डॉ. गोपीनाथ एन. शेनॉय आणि मेडिकोलीगल कन्सल्टंट व हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर डॉ. सुगंथा अय्यर यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी हे या सत्राचे समन्वयक होते.

यावेळी ॲडव्होकेट आणि मेडिकोलीगल तज्ज्ञ डॉ. गोपीनाथ एन. शेनॉय यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रात वाढते तंत्रज्ञान आणि गुंतागुंतीच्या उपचारपद्धती लक्षात घेता डॉक्टरांनी कायदेशीर नियम आणि नैतिक निकष यांची सखोल माहिती ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णाची संमती योग्य पद्धतीने नोंदवणे, उपचारांची स्पष्ट माहिती देणे आणि पारदर्शक संवाद ठेवणे यामुळे भविष्यातील वाद टाळता येऊ शकतात.

मेडिकोलीगल कन्सल्टंट आणि रुग्णालय प्रशासक डॉ. सुगंथा अय्यर यांनी रुग्ण-डॉक्टर नात्यातील विश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. रुग्णाला समजेल अशा भाषेत आजार, उपचार आणि जोखीम समजावून सांगणे ही डॉक्टरांची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच रुग्णाच्या स्वायत्ततेचा आदर, गोपनीयता राखणे आणि रुग्णहिताला प्राधान्य देणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.

या चर्चासत्रात निष्क्रिय इच्छामरण आणि ‘सन्मानाने मृत्यूचा अधिकार’ या विषयांवरही चर्चा झाली. न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे या संवेदनशील विषयाकडे अधिक स्पष्टतेने पाहता येते, असे तज्ज्ञांनी सांगितले. याशिवाय, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नैतिक प्रश्नांवरही यावेळी लक्ष वेधण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनावेळी शिक्षकांना अनेक नैतिक द्वंद्वांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठीही स्वतंत्र नैतिक मार्गदर्शक तत्त्वांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

सत्राचे समन्वयक डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले की, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ही डॉक्टरांच्या नैतिक आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करणारी संस्था आहे. डॉक्टरांनी नियमांचे पालन आणि सतत नैतिक प्रशिक्षण घेतल्यास आरोग्य व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0000

दत्तात्रय कोकरे/वि.स.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed