• Tue. Sep 22nd, 2026

शासन व पोलिसांचे कार्य जनतेची सेवा करणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 29, 2026
शासन व पोलिसांचे कार्य जनतेची सेवा करणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

नागपूर, दि. 29 : ब्रिटिशांना भारतावर राज्य करायचे होते म्हणून त्यांनी राज्यकर्त्यांच्या भूमिकेतून फौजदारी कायदे आणले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या कायद्यांमध्ये बदल करून जनतेच्या सेवेसाठी फौजदारी कायदे तयार झाले. यामुळे देशात पोलीस व्यवस्था आणि अपराधिक न्याय प्रणालीत सुसूत्रता येऊन जनतेला जलद व योग्य न्याय मिळत आहे. सर्व राज्यांनी या कायद्यांची उत्तम अंमलबजावणी सुरू केली असून शासन व पोलिसांचे कार्य जनतेची सेवा करणे असल्याचे यातून अधोरेखित होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

पोलीस मुख्यालय स्थित शिवाजी क्रिडांगणावर आयोजित 69 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या विकासात कायदा व सुव्यवस्थेला अनन्य साधारण महत्त्व आहे.  देशासमोर उभ्या राहिलेल्या मोठ्या आव्हानांच्या वेळी पोलीस विभागाने तत्परतेने प्रथम प्रतिसाद देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाचे योगदान दिले आहे. 69 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजक पद महाराष्ट्राला व नागपूरला मिळाले आहे. तसेच देशात या मेळाव्याचे पहिले आयोजनही नागपूरमध्येच झाले याचे समाधान आहे. या मेळाव्यात गुन्हे शोधणात व्यावसायिक कौशल्य, न्याय वैदक विज्ञान, संगणक प्रणाली आणि श्वान प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चा, परिसंवाद, स्पर्धा होणार आहेत. वेगवेगळ्या राज्यातील चांगल्या कार्य पद्धतीची देवाण-घेवाण होणार आहे. यातून सामान्य जनतेला न्याय देण्याच्या कार्यात अधिक स्पष्टता व गती येणार असल्याचा विश्वास आहे.

महाराष्ट्र पोलीस विभागानेही गुन्ह्यांच्या बदलत्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी अनेक महत्वाचे बदल केले असून देशातील मोठे, आधुनिक, व्यावसायिक पोलीस दल म्हणून लौकिक मिळवला आहे. देशातील सर्वोत्तम सायबर लॅब राज्य पोलीस दलाकडे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुन्हे अन्वेषणात राज्याने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या चांगल्या कार्यपद्धती या कर्तव्य मेळाव्याच्या माध्यमातून इतर राज्यांना कळणार असून अन्य राज्यातील चांगल्या कार्यपद्धतीचीही ओळखही होणार आहे. या मेळाव्यात सहभागी प्रत्येकजण आपले कौशल्य पणालावून उत्तम प्रदर्शन करतील अशा भावना व्यक्त करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी प्रास्ताविक केले तर नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी आभार मानले.

येत्या 3 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या कर्तव्य मेळाव्यात 29 राज्य व केंद्र शासित प्रदेश तसेच केंद्रीय सुरक्षा बलाचे 1 हजार 327 पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसेच 146 श्वान सहभागी झाले आहेत.

तत्पूर्वी, आंध्र प्रदेश, आसाम रायफल, अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार, बिहार, सीमा सुरक्षा बल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, इंडो तिबेटीयन बॉर्डर फोर्स, जम्मू काश्मीर, झारखंड, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब, ओडिशा, राजस्थान, रेल्वे सुरक्षा बल, विशेष सुरक्षा समूह, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र राज्य व केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्रीय सुरक्षा बलांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले.

अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रक मंडळ आणि आंध्र प्रदेश राज्य पोलीस विकास नियोजन परिषद यांनी यावर्षीच्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्याचे आयोजक पद महाराष्ट्राला दिले असून नागपूर मध्ये हे आयोजन होत आहे या मेळाव्याची सुरुवात 1959 मध्ये नागपूर मधूनच झाली होती.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed