• Tue. Sep 22nd, 2026

राज्याच्या प्रशासकीय सुधारणांमध्ये नागपूर महसूल व पोलीस विभागाची दमदार कामगिरी – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 28, 2026
राज्याच्या प्रशासकीय सुधारणांमध्ये नागपूर महसूल व पोलीस विभागाची दमदार कामगिरी – महासंवाद

१५० दिवस ई-गव्हर्नन्स मोहिमेमध्ये महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषदेला अनुक्रमे प्रथम, द्वितीय पुरस्कार

नागपूर, दि. 28 : लोकाभिमुख व तत्पर पारदर्शक प्रशासनाच प्रत्यय सर्वसामान्यांना यावा, शासकीय कार्यालयाच्या कार्यपद्धतीमध्ये बदलत्या तंत्रज्ञानानुरूप कार्यपद्धतीत सुधारणा व्हाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स मोहिमेमध्ये महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषद असा तिहेरी सन्मान झाला. राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांच्या गटात नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर विशेष पोलीस महानिरीक्षक (Special IGP) कार्यालय, नागपूर परिक्षेत्र यांना ई-गव्हर्नन्स व वेबसाईट विकास क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल व नागपूर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला आपले सरकार प्रणाली, ई ऑफिस, व्हाट्सअप चॅटबॉटसाठी द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित केले. नागपूर जिल्हा परिषदेला प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमतेत वाढ आणि निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी विकसित केलेल्या “झेडपी पॅनोरमा” ZP Panorama या डॅशबोर्डसाठी गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अपूर्व यशाबद्दल पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्यावतीने अपर आयुक्त राजेश खवले यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित समारंभासाठी माहिती तंत्रज्ञान तथा संस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मोहिमे अंतर्गत कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, ए आय व ब्लॉकचेनचा शासकीय कामकाजात वापर आणि जीआयएस चा कामात वापर अशा एकूण ७ सर्वंकष मुद्यांवर नागपूरने विशेष कामगिरी केली.

 

नागपूर विभागाने या मोहिमेमध्ये केलेली कामगिरी ही आदर्श – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

नागपूर विभागाच्या या अपूर्व कागिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. “ई-गव्हर्नन्स ही केवळ तांत्रिक संकल्पना नसून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचे प्रभावी साधन आहे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी, त्यांना सुखकर प्रशासनाचा प्रत्यय देण्यासाठी नागपूर विभागाने या मोहिमेमध्ये केलेली कामगिरी ही आदर्श आहे” या शब्दात त्यांनी कौतुक केले.

या मोहिमेतील कार्यपद्धती अधिक सक्षम होत जावी – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुसह्य व्हावे यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने आपण विविध अभियान राबवितो. बदलत्या तंत्रज्ञानाचा चपखल वापर जेवढा अधिक होईल त्या प्रमाणात लोकांना उत्तम व पारदर्शी प्रशासनाचा अनुभव मिळेल. यादृष्टीने आपल्या महसूल, पोलीस व जिल्हा परिषदेने साध्य केलेले यश महत्त्वाचे आहे. ही कार्यपद्धती अधिक सक्षम होत जावी व प्रत्येकाला उत्तम प्रशासनाची अनुभूती मिळावी असे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगून संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे द्योतक

विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, “हा पुरस्कार संपूर्ण नागपूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे द्योतक आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासन अधिक सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील. भविष्यातही अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जलद, सुलभ आणि दर्जेदार सेवा पुरविण्यावर भर दिला जाईल.” असे त्यांनी सांगितले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *