• Tue. Jun 16th, 2026
    Devendra Fadnavis : ‘अशोक खरातचे अनेक कांड बाहेर येत आहेत’, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अशोक खरातचे अनेक कांड बाहेर येत आहेत, अशी माहिती सभागृहात दिली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर भूमिका मांडली. “विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणी काल मी सविस्तर निवेदन दिलं आहे. मी सर्वांना विनंती करेन की, ज्यांच्याकडे या प्रकरणाची माहिती आली असेल तर ती माहिती शासनापर्यंत पोहोचवावी. कारण या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळवून त्या व्यक्तीला अशी शिक्षा द्यायची आहे की, अशा पद्धतीने वागणारे लोकं आहेत त्यांना जरब बसली पाहिजे. या प्रकरणाने आपण नेमके कुठे जात आहोत? असा विचार करण्याची वेळ आली आहे”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

    “आपण नेहमी असं म्हणतो की, आत्मविश्वास असावा पण अतिआत्मविश्वास असू नये. तसेच आपण सर्व श्रद्धा मानणारे लोकं आहोत. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप छोटी रेघ आहे. ती रेघ ओलांडली जाते तेव्हा काय होतं ते आपण या प्रकरणातून बघितलं आहे. पण एकप्रकारे अंधश्रद्धेत विवेक हरवतो ते आपल्याला या प्रकरणात बघायला मिळालं आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

    “आपला महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत गुलाबराव महाराज, संत गाडगेबाबा, संत सेवालाल महाराज अशी एक थोर पंरपरा असलेला आपला महाराष्ट्र आहे. यांच्यापैकी कुणीही देवाचं अस्तित्व नाकारलेलं नाही. पण या सगळ्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    “ज्ञानेश्वर माऊलींनी धर्म आणि श्रद्धेचा मार्ग पसायदानातून सांगितला. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, त्यांनी दृष्ट प्रवृत्तींवर प्रहार केला आहे. अंधश्रद्धा, अंधार, अज्ञान हा सगळा नाहीसा झाला पाहिजे आणि जग ज्ञानरुपी प्रकाशमय झालं पाहिजे, अशी प्रकारची भावना आणि कामना त्यांनी जगाकरता केली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात,जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें, तोचि साधू ओळखावा, देव तेथेंचि जाणावा, अशा पद्धतीने संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. त्यामुळे देवत्व कुठे बघितलं पाहिजे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे”, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.

    ‘जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम लवकरच लागू होणार’

    “जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम झाले नाहीत असा मुद्दा चर्चेत आला. हे खरंच आहे. त्याची माहिती घेतली असता, त्याचे नियम अंतिम टप्प्यात आहेत. कायदा आणि प्रशासनाने त्यांना मान्यता दिलेली आहे. पण ते नियम नसले तरी सेक्शन 3 असल्याने नियमांचा अडसर येत नाही. या कायद्याची अंमलबजावणी आपण ताकदीने केली आहे. या प्रकरणातही आपण कायद्याची अंमलबजावणी केली आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

    मुख्यमंत्र्यांचं जादूटोण्यावर उपरोधिक भाष्य

    “जादूटोणा करुन समस्या संपल्या असता तर या भोंदू खरातला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सुरक्षा सल्लागार नेमला असता. म्हणजे सगळेच विषय संपले असते. युद्ध आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आपण इथे बसूनच टाचण्यांनी संपवलं असतं. सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता पडली नसती. पाच-दहा भोंदू बाबा पाठवले असते. आपल्याला प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून निवडणुका जिंकता आल्या असत्या”, असं देवेंद्र फडणवीस उपरोधिकपणे म्हणाले.

    “आपण ज्याला अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि कुणाचं नुकसान होत नाही ही खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याच अहित होतं ती खरी श्रद्धा असू शकत नाही. ती अंधक्षद्धा आहे. त्या विरुद्ध मोठ्या कडक पद्धतीने राज्य सरकार कारवाई करेल. अशोक खरातचे अनेक कांड बाहेर येत आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा