• Sun. Jun 14th, 2026

    मुंबईत 27-28 मार्चला ‘PULSE-2026’ आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद; 2900 तज्ज्ञांसह तंत्रज्ञान व संशोधनावर सखोल चर्चा

    मुंबईत 27-28 मार्चला ‘PULSE-2026’ आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद; 2900 तज्ज्ञांसह तंत्रज्ञान व संशोधनावर सखोल चर्चा

    PULSE Global Medical Conference: भारताच्या वैद्यकीय भविष्याची दिशा मुंबईत होणाऱ्या या परिषदेत ठरणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रुग्णालयं, ग्रामीण भागातील आरोग्य सेवांसह अनेक विषयांवर दोन दिवस चर्चा होईल.

    वर्षा फडके – आंधळे, उपसंचालक (वृत्त)
    माहिती व जनसंपर्क महासंचालनालय:
    मुंबईत 27 आणि 28 मार्च रोजी‘पल्स-2026’ ही आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद होणार आहे. हा परिषद राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या पुढाकारातून ही आयोजित केली गेली आहे. मुंबईतील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

    विविध विषयांवर 20 सत्र

    ‘Platform for Unified Learning, Skills, Health and Education’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेत देश-विदेशातील सुमारे 2100 तज्ज्ञ, 130 नामांकित डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील संशोधक सहभागी होणार आहेत. विविध विषयांवर 20 सत्रांचे आयोजन करण्यात आले असून वैद्यकीय शिक्षण, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि आरोग्य व्यवस्थापनावर सखोल चर्चा या परिषदेत होणार आहे.

    आजच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल हेल्थ, रोबोटिक सर्जरी आणि टेलीमेडिसिन यांसारख्या नव्या संकल्पनांमुळे उपचार पद्धती अधिक अचूक आणि परिणामकारक होत आहेत. ‘पल्स-2026’मध्ये या तंत्रज्ञानाचा वैद्यकीय शिक्षण आणि प्रत्यक्ष आरोग्य सेवांमध्ये कसा प्रभावी वापर करता येईल, यावर विशेष भर दिला जाणार आहे. ‘डिजि होम’ आणि ‘टेक टॉक’ या उपक्रमांतर्गत 360 डिग्री डोममध्ये रोबोटिक सर्जरी, व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे प्रशिक्षण आणि डिजिटल हॉस्पिटल व्यवस्थापनाचे सादरीकरण होणार आहे.

    ‘महाराष्ट्र ब्रँड’ मजबूत करण्यावर भर

    जागतिक स्तरावर वेगाने वाढत असलेल्या वैद्यकीय पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी ही परिषद महत्त्वाची संधी ठरणार आहे. परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचारांची सुविधा उपलब्ध असल्याने भारताकडे परदेशी रुग्णांचा ओढा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘पल्स-2026’च्या माध्यमातून महाराष्ट्राला वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे. राज्यातील रुग्णालये, संशोधन संस्था आणि पर्यटन क्षेत्र यांच्यात समन्वय साधून ‘महाराष्ट्र ब्रँड’ मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

    ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी टेलीमेडिसिन, मोबाइल हेल्थ युनिट्स आणि डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्स यांसारख्या उपाययोजनांवरही परिषदेत चर्चा होणार आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील दरी कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे.

    याशिवाय, स्टार्ट-अप्स, औषधनिर्मिती उद्योग, वैद्यकीय उपकरण उत्पादक आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या सहभागामुळे संशोधन आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. नवकल्पनांना चालना देणारा आणि भविष्यातील आरोग्य व्यवस्थेचा मार्ग दाखवणारा असा हा महत्त्वपूर्ण मंच ठरणार आहे.एकूणच, ‘पल्स-2026’ ही परिषद महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राला जागतिक पातळीवर अधिक ठळक ओळख मिळवून देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा