सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतील गोंधळामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. लोकशाहीची हत्या झाल्याची टीका करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची राज्यपाल स्तरावरून न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत झालेल्या गोंधळावर तीव्र शब्दात टीका केली आहे. “शिवसेना आणि राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व आघाडी होती. सदस्यांचे स्पष्ट बहुमत त्यांच्या बाजूने असताना भाजप नेतृत्वाने सत्ता बळकावण्याचा केलेला किळसवाणा प्रकार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग आहे. महाराष्ट्राचे राजकारण नक्की कोणत्या थराला गेलंय, हे यातून स्पष्ट होतंय”, असा हल्लाबोल त्यांनी भाजपच्या राजकीय रणनितीवर केला आहे.
“राजकारणाची पातळी किती खालावली..”
“राज्यात भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना यांची एकत्र सत्ता असताना साताऱ्यात घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय आहे. यशवंतरावांच्या सातारा जिल्ह्यातच लोकशाहीची अशी हत्या होत असेल तर राजकारणाची पातळी किती खालावली आहे, हे दिसते.
Ashok Kharat: भोंदू बाबा अशोक खरातचं आणखी एक कांड; जमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा जीव घेतल्याचा आरोप
सत्ता हेच सर्वस्व मानून महाराष्ट्राचा यशवंत विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. पोलीस व प्रशासनाची भूमिका देखील गंभीर प्रश्न उपस्थित करणारी होती, अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.” तसेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने सत्य समोर आणल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
सातारा जिल्हापरिषदेत काय घडलं?
साताऱ्यात ३५ सदस्यांचे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला सत्तेने हुलकावणी दिली आहे. भाजपचे केवळ २८ सदस्य असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोननंतर हालचालींना वेग आला.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आखलेल्या अचूक रणनीतीमुळे भाजपने ३३ या जादुई आकड्याला स्पर्श केला. या राजकीय उलथापालथीमुळे प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी, तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
