• Sun. Jun 7th, 2026
    संवैधानिक पदाच्या राजीनाम्यानंतर Rupali Chakankar यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घेणार का? राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने दिली महत्त्वाची माहिती

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्ष महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेणार का? याबाबत पक्षातच वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अनिल पाटील यांच्याशी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ने संपर्क साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकतंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या पाद्यपूजनाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. विरोधकांसह सोशल मीडियावर राजीनाम्याची मागणी वाढल्यानंतर अखेर रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा देण्यापूर्वी रुपाली चाकणकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबतचे पत्र दिले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेवून आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

    रुपाली चाकणकर यांनी राजीनाम्या दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या आक्रमक झालेल्या बघायला मिळाल्या. त्यांनी तर रुपाली चाकणकर यांना अटक करावी, अशी मागणी माध्यमांसमोर केली. तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची नाहक बदनामी झाली. त्यामुळे त्यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण असा मतप्रवाह खरंच आहे का किंवा रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा यासाठी पक्षात काही बैठका घेण्यात आल्या का? याबाबत आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’कडून याबाबत फोनवरुन संपर्क साधण्यात आला. यावेळी त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

    माजी मंत्री अनिल पाटील काय म्हणाले?

    “रुपाली चाकणकर यांचं जे संविधानिक पद होतं त्याचा त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत राजीनामा घ्यावा का? याबद्दल पक्षाची कोअर कमिटी निर्णय घेईल. त्याबाबत कोणतीही चर्चा सुरु असल्याबाबत माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली. तसेच याबाबत चर्चा करण्यासाठी काल बैठक झाली अशा बातम्या समोर येत होत्या? त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न अनिल पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “नाही. काल बैठक झाली अशी काही माहिती मला मिळालेली नाही. तसेच अशी काही बैठक होणार असल्याची कोणतीही माहिती मला मिळालेली नाही”, अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्षाच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह असल्याच्या वृत्ताचं अनिल पाटील यांनी खंडन केलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा