• Sat. Jun 6th, 2026
    भोंदूबाबा Ashok Kharat याचा कौतुक करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पद्मश्री पोपटराव पवारांकडून अखेर स्पष्टीकरण

    भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हिरवे बाजारचे पद्मश्री पोपटराव पवार यांचा अशोक खरात याचा कौतुक करताना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता पोपटराव पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच आता या प्रकरणाला नवा राजकीय आणि सामाजिक ट्विस्ट मिळाला आहे. आदर्श गाव हिवरे बाजारचे ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार यांचा खरातचं कौतुक करतानाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओमुळे पवार आणि खरात यांच्यातील संबंधांबाबत चर्चांना उधाण आले असून पवारांवर टीकेची झोड उठली आहे.

    कोणतेही निकटचे संबंध नसल्याचंही त्यांनी ठामपणे नमूद केलं

    या वादावर स्वतः पोपटराव पवारांनी पुढे येत स्पष्टीकरण दिलं असून, व्हायरल होणारा व्हिडीओ हा तब्बल तीन वर्षांपूर्वीचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामानिमित्त त्यावेळी खरात यांची भेट झाल्याचं सांगत, 2012 आणि 2018 या दोन वेळाच प्रत्यक्ष संपर्क झाल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय कोणतेही निकटचे संबंध नसल्याचंही त्यांनी ठामपणे नमूद केलं. दरम्यान, वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी कठोर भूमिका घेत कायद्याप्रमाणे गुन्हा सिद्ध झाला तर संबंधिताला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. समाजात विकृत कृत्यांना कोणतीही माफी नसल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.

    पवार आणि खरात यांचं नातं काय?

    भोंदूबाबा प्रकरणामुळे आधीच संतप्त झालेल्या जनतेमध्ये या व्हिडीओमुळे अधिकच खळबळ उडाली असून नेमकं पवार आणि खरात यांचं नातं काय? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पवारांचं स्पष्टीकरण जनतेच्या रोषाला कितपत शांत करतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    हिवरे बाजार ग्रामस्थांकडून भोंदूबाबा खरातचा निषेध

    हिवरे बाजार ग्रामस्थांनी या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन या कृत्याचा निषेध करून त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, असे मत व्यक्त केले. गेल्या ३५ वर्षाच्या कष्टामुळे आज हिवरे बाजारचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पद्मश्री सारखा सन्मान मिळून जगाच्या नकाशावर गेलेले आहे. अशा परिस्थितीत वाईट वृत्तींना पाठबळ देण्याचे काम कदापि हिवरे बाजारकडून शक्यच नाही. त्यामुळे ही बातमी चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आली आहे.

    हिवरे बाजार हे महाराष्ट्राच्या वारकरी संतांच्या विचारावर आधारित पर्यावरण, वनसंवर्धन, जलसंवर्धन, स्वच्छता, व्यसनमुक्ती, स्वयंशिस्त यावर उभे राहिलेले आहे. ग्रामविकासाबरोबरच अध्यात्माची बैठक या गावात उभी राहिलेली आहे. हिवरे बाजारमधील विकासकामे पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी २०१२ मध्ये बैठक घेऊन जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगार येथील दगडी कारागिरांची भेट घेतली. त्यांनी याअगोदर इतर ठिकाणी दगडात बांधलेल्या मंदिराची प्रामुख्याने राशीन ता.कर्जत,श्री.संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर ता.नेवासा त्याचबरोबर मिरगाव ता.सिन्नर येथील ईशान्श्वर मंदिराचे दगडी काम पाहण्यासाठी आम्ही गेलो. त्यानंतर आम्ही हिवरे बाजार ग्रामस्थांनी श्री.विश्वेश्वर मंदिराचा गाभारा दगडी कामाचा शुभारंभ केला.

    सध्या समाजमाध्यमांवर जी बातमी फिरत आहे हा व्हिडीओ चार वर्षापुर्वीचा असून तो कार्यक्रम सिन्नर मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी १० ते १२ वारकरी संप्रदायातील मंडळीसोबत हजारोवर जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. तोपर्यंत खरातची विकृत प्रवृत्ती माहिती नव्हती. त्यानंतर नाशिकमध्ये इतर कार्यक्रमाप्रसंगी खरातशी बोलण्याचा संबंध आला. त्यातही हिवरे बाजारचे धार्मिक कार्य सोडून खरातशी कुठलाही दुरान्वये संबंध आलेला नाही.

    अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्यस्तरीय दोन दिवसाचे शिबीर कै.नरेंद्र दाभोळकर यांनी हिवरे बाजारला घेतले होते. कुठलीही घटना घडली त्याचाशी काहीही संबंध नसणाऱ्या व्यक्तीवर जबाबदारी टाकणे हे चुकीचे आहे. हिवरे बाजार हे गेल्या ३५ वर्षात कुठल्याही वितंडवादात पडलेले नाही.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा